पुणे महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे उद्यानात ३२ वे भव्य किल्ले प्रदर्शन व स्पर्धा; ११ नोव्हेंबरपर्यंत विनामूल्य पाहता येणार ऐतिहासिक किल्ले

पुणे महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजीराजे उद्यानात ३२ व्या किल्ले स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ११ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना विनामूल्य पाहण्याची संधी मिळणार आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे उद्यानात ३२ वे भव्य किल्ले प्रदर्शन व स्पर्धा; ११ नोव्हेंबरपर्यंत विनामूल्य पाहता येणार ऐतिहासिक किल्ले
Pune Municipal Corporation, PMC Kille Spardha, Sambhaji Garden Pune, Fort Exhibition Pune, Diwali Kille Spardha, Ashok Ghorpade, Pune News Marathi

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

पुणे:

वाढत्या शहरीकरणामुळे आणि जागेच्या अभावामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास कळावा तसेच इतिहास व भूगोलाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पुणे महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने ३२ व्या किल्ले स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे ५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.   

या किल्ले स्पर्धेत यंदा एकूण ४४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली:

१. विभाग १: शालेय विद्यार्थी

२. विभाग २: शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था/मंडळे

३. विभाग ३: खुला गट (१६ वर्षांवरील विद्यार्थी व नागरिक)   

या स्पर्धेत सादर केलेल्या किल्ल्यांचे परीक्षण इतिहास व भूगोल तज्ज्ञ जगजीवन काळे, संजय शिवराम साळुंके, महेश शिंदे, कैलास चौधरी, अमोल गोविंदलाल उणेचा, मयुरेश लव्हाटे व सुमित चव्हाण यांनी केले. प्रत्येक विभाग व गटामध्ये प्रथम क्रमांकास ₹ ५,०००/-, द्वितीय क्रमांकास ₹ ४,०००/- आणि तृतीय क्रमांकास ₹ ३,०००/- तसेच सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ₹ ७,०००/- चे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.   

दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन व यशस्वी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास भूगोल तज्ञ डॉ. सुरेश गरसोळे, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य बी. एस. पोळेकर व संदीप काळे, सह महापालिका आयुक्त तथा मुख्य उद्यान अधीक्षक व सदस्य सचिव (वृक्ष प्राधिकरण) डॉ. अशोक दि. घोरपडे, उद्यान अधीक्षक संतोषकुमार कांबळे, उद्यान अधीक्षक प्रीती सिन्हा, उद्यान अधीक्षक स्नेहल हरपळे, कार्यकारी अभियंता (विद्युत) आरती नाथी, सहायक उद्यान अधीक्षक रत्नाकर करंदे, सहायक उद्यान अधीक्षक श्रुती नाझीरकर-गावडे आणि उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे सेवक उपस्थित होते.   

या प्रदर्शनामध्ये रायगड, राजगड, सुवर्णदुर्ग, सिंहगड, हरीश्चंद्रगड, सिंधुदुर्ग, जंजिरा, पन्हाळा, रतनगड, विसापूर, पद्मदुर्ग, तोरणा, मलंगगड, रोहिडा इत्यादी किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. सोबतच किल्ल्यांचे नकाशे आणि पर्यावरण संवर्धनावर आधारित घोषवाक्येही मांडण्यात आली आहेत.   

हे प्रदर्शन दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार असून, पुणेकरांनी व इतिहासप्रेमींनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.