पुणे महापालिकेच्या सर्व मालमत्तांचे GIS सर्वेक्षण; एकत्रित डिजिटल डेटाबेस तयार करण्याची प्रक्रिया सुरू
पुणे महानगरपालिकेने सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून GIS आधारित एकत्रित डिजिटल डेटाबेस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. EMAMS प्रणालीद्वारे मालमत्ता व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे महानगरपालिका, दि. २२ एप्रिल २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील सर्व मालमत्तांचे जतन, संरक्षण, देखभाल आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून एकत्रित डिजिटल डेटाबेस तयार करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि विविध विभागांकडे असलेल्या मालमत्तांची २१ मुद्द्यांनुसार सविस्तर माहिती अद्ययावत केली जाणार आहे. यामध्ये मालमत्तेचा वापर, क्षेत्रफळ, सर्वे नंबर, भाडेपट्टा स्थिती, करारनामे, अतिक्रमण स्थिती तसेच अक्षांश-रेखांश यांसारखी महत्त्वाची माहिती संकलित केली जाणार आहे.
या प्रक्रियेसोबतच मालमत्ता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी EMAMS (Enterprise Municipal Asset Management System) प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे. या प्रणालीमुळे भाडेपट्टा व महसूल व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे.
नवीन प्रणाली अंतर्गत GIS मॅपिंग, डिजिटायझेशन, मालमत्तांचे मूल्यांकन, सिंगल विंडो प्लॅटफॉर्म, ऑनलाइन पेमेंट गेटवे, तसेच सिस्टीम मॉनिटरिंग व रिपोर्टिंगसाठी डॅशबोर्ड विकसित करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून सर्व मालमत्तांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन नियोजन अधिक सुलभ होणार आहे.
या संदर्भात ओम प्रकाश दिवटे यांनी सर्व विभागांचा आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी डॉ. अशोक घोरपडे, तुषार बाबर, आशा राऊत, निखील मोरे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0