पुण्यात “शहर परिवर्तन समिती”ची स्थापना; ‘MISSION 32’ अंतर्गत रस्ते व पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर

पुणे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी “शहर परिवर्तन समिती”ची स्थापना करण्यात आली आहे. ‘MISSION 32’ अंतर्गत 32 प्रमुख रस्त्यांचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असून भूसंपादन, अतिक्रमण हटविणे आणि डिजिटल तक्रार निवारण यावर भर देण्यात आला आहे.

Apr 17, 2026 - 00:31
 0  2
पुण्यात “शहर परिवर्तन समिती”ची स्थापना; ‘MISSION 32’ अंतर्गत रस्ते व पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर
पुणे महानगरपालिका, शहर परिवर्तन समिती, मिशन 32

पुणे महानगरपालिका कडून पुणे शहरातील वाढत्या शहरी आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी “शहर परिवर्तन समिती”ची स्थापना करण्यात आली आहे. विविध शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये समन्वय वाढवून रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात येत आहे.

या समितीची दुसरी बैठक दि. १३ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी यापूर्वीच्या बैठकीतील निर्णयांचा आढावा घेऊन विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

शहरातील १२ “मिसिंग लिंक” रस्त्यांच्या विकासासाठी भूसंपादन, अतिक्रमण हटविणे आणि मोजणीतील अडचणी यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. बाणेर–पाषाण लिंक रोड, वाकड–कस्पटे वस्ती रोड, आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज आणि वारजे परिसरातील रस्त्यांवर प्राधान्याने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय “MISSION 32” अंतर्गत पुण्यातील ३२ प्रमुख रस्त्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये प्रत्येकी एक रस्ता विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, रस्त्यांवरील अडथळा ठरणारे फीडर पिलर तातडीने हलविण्याचे निर्देश देण्यात आले.

नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेने ६ मोबाईल अ‍ॅप्स विकसित केली असून त्याद्वारे रस्त्यांशी संबंधित तक्रारी नोंदवता येणार आहेत. तसेच वाहतूक पोलीस विभागाच्या PTP अ‍ॅपशी समन्वय साधण्याबाबतही चर्चा झाली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वॉटर लॉगिंग ठिकाणे निश्चित करून प्रत्येक परिमंडळात आवश्यक कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वन विभागाशी संबंधित भूसंपादन, रिक्षा स्टँडचे नियोजन, बेवारस वाहने हटविणे आणि “Pay & Park” योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

पाणीपुरवठा विभागासाठी आवश्यक जागांचे भूसंपादन व मोजणी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठीचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ३२ प्रमुख रस्त्यांसाठी मनपा व पोलीस विभागाचे समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणार आहेत.

या बैठकीस महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0