विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी पुण्यात सर्वपक्षीय बैठक; BLA नियुक्ती आणि मतदार जनजागृतीवर भर
पुणे महानगरपालिकेत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार बूथ लेव्हल असिस्टंट (BLA) नियुक्ती, मतदार यादी पुनरीक्षण आणि जनजागृती मोहिमेवर भर देण्याचे आवाहन केले.
पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Summary Revision - SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक पुणे महानगरपालिका भवनातील आयुक्त कार्यालयात पार पडली.
बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्व राजकीय पक्षांनी बूथ लेव्हल असिस्टंट (BLA) यांची नियुक्ती करून त्यासंदर्भातील प्रक्रिया पुढील दोन दिवसांत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत व्यापक जनजागृती करून जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी सर्व पक्षांनी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस उपायुक्त (निवडणूक) प्रसाद काटकर उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे विरोधी पक्षनेते निलेश निकम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी सुनील शिंदे, भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी व्यंकोजी खोपडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, आवश्यक दुरुस्त्या करणे आणि मतदान प्रक्रियेला अधिक पारदर्शक व अचूक बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0