राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे २६ जून रोजी उद्घाटन; शाहू जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन २६ जून रोजी होणार आहे. यानिमित्त शाहू जयंतीनिमित्त व्याख्यानमाला तसेच राजर्षी शाहू पुरस्कार वितरण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २४ : कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते या नूतनीकरण झालेल्या भवनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या उद्घाटन समारंभाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
दरम्यान, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही २६ जून रोजी ‘राजर्षी शाहू जयंती’ उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त २१ ते २५ जून या कालावधीत राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
शाहू जयंतीच्या मुख्य कार्यक्रमात २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमांमुळे कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0