राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी अभिवादन; पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुष्पहार अर्पण
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील लक्ष्मी विलास पॅलेस या जन्मस्थळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचे स्मरण करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. समाजसुधारक, लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीचे इंद्रजीत सावंत आणि वसंतराव मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले. सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा दूरदर्शी निर्णय, सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे, जातीभेद निर्मूलनासाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि लोककल्याणकारी धोरणांमुळे शाहू महाराजांनी आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनात दिलेले योगदान अधोरेखित करण्यात आले.
उपस्थितांनी शाहू महाराजांच्या विचारांचा आणि सामाजिक समतेच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक तसेच शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना शाहू जन्मस्थळ संग्रहालयासाठी जमीन हस्तांतरण तसेच कोल्हापूर इतिहास संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0