पवना धरण वाचवा; मुरूम माफियांवर MCOCA अंतर्गत कारवाई करा – युवराज दाखले

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाविरोधात शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.

May 13, 2026 - 23:05
 0  33
पवना धरण वाचवा; मुरूम माफियांवर MCOCA अंतर्गत कारवाई करा – युवराज दाखले
पवना धरण, मुरूम माफिया, युवराज दाखले, मावळ, अवैध उत्खनन,

पिंपरी-चिंचवड, दि. १३ :

मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम व माती उत्खनन सुरू असून या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

युवराज दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत ५० पेक्षा अधिक हायवा डंपरच्या माध्यमातून पवना धरण परिसरातून अवैध मुरूम वाहतूक केली जात आहे. JCB आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने २० ते ३० फूट खोल खड्डे खोदून मुरूम चोरी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गेव्हाण खडक, चांदेवाडी, ठाकूरसाई, ब्राह्मोली, कोथुर्णे आणि शिवली मार्गे विना नंबर प्लेटच्या हायवा ट्रकद्वारे मुरूम वाहतूक होत असल्याचा दावा करत स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

युवराज दाखले यांनी या अवैध उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधताना म्हटले की,

पवना धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होत असून साठवण क्षमता कमी होत आहे.

भूजल पातळी खालावत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होत आहे.

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी नापीक बनत आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांनी शासनाकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पवना धरण परिसरात २४ तास विशेष भरारी पथक तैनात करणे, मुरूम माफिया आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल करणे, पवना धरणाच्या पाच किलोमीटर परिसराला “नो मायनिंग झोन” घोषित करणे, ड्रोन सर्व्हे करून दंडात्मक कारवाई करणे तसेच सर्व हायवा डंपर जप्त करून अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच जिल्हाधिकारी पुणे यांनी सात दिवसांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

“सात दिवसांत कारवाई न झाल्यास शिवशाही व्यापारी संघ आणि शेतकरी मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करतील. मुरूम माफियांना मावळातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा इशाराही युवराज दाखले यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0