सहकार उद्योजक व माजी मंत्री सुभाष देशमुख यांचा ‘स्वराज्य परिवार’कडून सन्मान
नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री व ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांचा मराठा समन्वय परिषद व स्वराज्य परिवाराच्या वतीने ऐतिहासिक मराठा जागरण कार्यातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. पानिपत युद्धानंतर उत्तर भारतातील मराठा वंशजांना ओळख मिळवून देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
नवी दिल्ली, दि. ७ मे २०२६ : महाराष्ट्र विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य तथा माजी कॅबिनेट मंत्री आणि माजी खासदार सुभाष देशमुख यांचा आज नवी दिल्ली येथे ‘स्वराज्य परिवार’ आणि मराठा समन्वय परिषद यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. ऐतिहासिक मराठा जागरण अभियानातील त्यांच्या योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला.
उत्तर भारतातील मराठा समाजाला त्यांच्या मूळ ओळखीशी जोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठा मिलन सोहळ्यात सुभाष देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. २७ नोव्हेंबर २००५ रोजी हरियाणातील करनाल येथे कर्ण स्टेडियममध्ये झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती.
या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, दिवंगत भय्यूजी महाराज, डॉ. पतंगराव कदम, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक येथून आलेल्या सुमारे हजार प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. तसेच पानिपत, सोनीपत, करनाल, कैथल आणि कुरुक्षेत्र परिसरातील दोन लाखांहून अधिक मराठा बांधव उपस्थित होते.
मराठा समन्वय परिषदेकडून उत्तर भारतातील पानिपत युद्धानंतर स्थायिक झालेल्या मराठा सेनानींच्या वंशजांचा शोध घेण्याचे अभियान राबविण्यात आले असून, त्या ऐतिहासिक कार्यात सुभाष देशमुख यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
आजच्या भेटीदरम्यान मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील यांनी सुभाष देशमुख यांना शाल, स्वराज्य जनक परिवाराची प्रतिमा, ‘शिवभारत दिनदर्शिका २०२६’ तसेच उत्तर भारतातील मराठा वंशजांच्या शोध मोहिमेवरील विशेष संदर्भ लेख भेट देऊन गौरव केला.
सोलापूर जिल्ह्यात सहकार आणि कृषी उद्योजकतेच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सुभाष देशमुख यांनी उल्लेखनीय कार्य केले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
