टीबीला घाबरू नका; वेळेवर उपचार घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होतो – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

टीबीमुक्त मुंबई’ अभियानांतर्गत चेंबूर येथे जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली. वेळेत निदान आणि नियमित उपचार घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होतो, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

टीबीला घाबरू नका; वेळेवर उपचार घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होतो – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
टीबीमुक्त मुंबई, टीबी जनजागृती फेरी, जिष्णू देव वर्मा, चेंबूर, क्षयरोग जनजागृती

मुंबई प्रतिनिधीb|  नरेश शिंदे 

मुंबई, दि. २९ : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांची नगरी असून, या स्वप्ननगरीला टीबीमुक्त करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. समाजाने एकत्रितपणे प्रयत्न केल्यास टीबीमुक्त मुंबई आणि टीबीमुक्त भारताचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होऊ शकते, असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केला.

टीबीविषयीचे गैरसमज दूर करून रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना मानसिक आणि सामाजिक आधार देणे आवश्यक आहे. टीबीला घाबरण्याचे कोणतेही कारण नसून, वेळेत निदान होऊन योग्य व नियमित उपचार घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

महाराष्ट्र लोकभवन, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्ष आणि श्री. नारायण गुरू कॉलेज ऑफ कॉमर्स, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानांतर्गत आज, दि. २९ जुलै २०२६ रोजी जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. चेंबूर येथील श्री. नारायण गुरू कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.

यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी, अभिनेते शिव ठाकरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले तसेच राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, टीबी हे केवळ वैद्यकीयच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक आव्हानदेखील आहे. मात्र, या आजाराला घाबरण्याची आवश्यकता नाही. टीबीवर प्रभावी उपचार उपलब्ध असून, रुग्णांनी वेळेवर तपासणी करून नियमित उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

केंद्र शासन, राज्य शासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमार्फत टीबी रुग्णांसाठी विविध उपचार सुविधा आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन उपचारांचा संपूर्ण कालावधी पूर्ण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

टीबी झालेल्या व्यक्तीशी भेदभाव करणे योग्य नसल्याचे सांगत राज्यपाल म्हणाले, “एखाद्या व्यक्तीला टीबी झाला म्हणून त्याच्याशी वेगळ्या पद्धतीने वागणे किंवा त्याला समाजापासून दूर ठेवणे चुकीचे आहे. अशा रुग्णांना मानसिक आधार आणि आवश्यक मदत करणे हीच खरी माणुसकी आहे.”

दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये टीबीविषयी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचेही राज्यपालांनी अधोरेखित केले. विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

समाजातील प्रत्येक घटकाने ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानात सक्रिय सहभाग घेतल्यास मुंबई लवकरच टीबीमुक्त होईल. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे टीबी रुग्णांसाठी आशेचा नवा किरण निर्माण होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

यावेळी अभिनेते राकेश बेदी यांनी मुंबईकरांच्या जिद्दीचे कौतुक केले. मुंबईकर कोणत्याही संकटाचा धैर्याने सामना करतात. ज्या पद्धतीने मुंबईकरांनी अनेक संकटांवर मात केली, त्याचप्रमाणे टीबीविरोधातील लढ्यातही नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘टीबीमुक्त मुंबई’ हे केवळ शासकीय अभियान न राहता लोकचळवळ बनणे आवश्यक आहे. जनसहभाग जितका वाढेल, तितके या अभियानाचे सकारात्मक परिणाम अधिक वेगाने दिसून येतील, असेही राकेश बेदी यांनी नमूद केले.