पारंपरिक पद्धतीने पुस्तक वाचनाचा आनंद हरवू नये – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

आर्यन हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व लेखक नीलकंठ नामजोशी यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेऊन आपल्या तीन पुस्तकांचा संच भेट दिला. ई-पुस्तकांच्या युगातही पारंपरिक पुस्तक वाचनाचा आनंद कायम राहावा, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

Aug 4, 2026 - 01:31
 0  10
पारंपरिक पद्धतीने पुस्तक वाचनाचा आनंद हरवू नये – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
जिष्णु देव वर्मा, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, नीलकंठ नामजोशी, आर्यन

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. ३ : ई-पुस्तकांच्या युगात वाचनाचे स्वरूप बदलत असले तरी पारंपरिक पद्धतीने पुस्तक वाचण्याचे महत्त्व वेगळे आहे. छापील पुस्तक हातात घेऊन वाचन करण्याचा आनंद कायम राहिला पाहिजे आणि नव्या युगात पारंपरिक पुस्तक वाचनाची ही समृद्ध परंपरा हरवू नये, अशी अपेक्षा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केली.

गिरगाव येथील आर्यन हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व लेखक नीलकंठ नामजोशी यांनी सोमवारी लोकभवन, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. यावेळी नामजोशी यांनी आपल्या लेखनातील तीन पुस्तकांचा संच राज्यपालांना भेट म्हणून दिला.

यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, एखादा लेखक पुस्तक लिहितो तेव्हा तो आपल्या विचारांना पंख देत असतो. लेखकाच्या विचारांमुळे जगाच्या ज्ञानात मोलाची भर पडते. पुस्तक कधीही मरत नाही आणि लेखक आपल्या लेखनाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी परत देत असतो.

एकमेकांना भेटताना केवळ पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तकांची भेट देण्याची परंपरा वाढली पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. पुस्तक ही केवळ भेटवस्तू नसून ज्ञान, विचार आणि संस्कारांचा ठेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र ही संत आणि वीरांची भूमी असून, राज्याला समृद्ध साहित्यिक आणि लेखकांची मोठी परंपरा लाभली आहे. अनेक लेखकांनी आपल्या साहित्यकृतींमधून समाजजीवन, संस्कृती, इतिहास आणि मानवी मूल्यांचे प्रभावी दर्शन घडविले आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

आजचा काळ ई-पुस्तकांचा असला तरी पारंपरिक पुस्तक वाचनाचे महत्त्व कायम आहे. छापील पुस्तकातून वाचन करताना मिळणारा अनुभव, त्यातील विचारांशी होणारा संवाद आणि पुस्तक वाचनाचा आनंद याला वेगळे स्थान आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना पारंपरिक पुस्तक वाचनाची आवड आणि संस्कृती जपली गेली पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

यावेळी नीलकंठ नामजोशी यांनी राज्यपालांना ‘मोगरा फुलाला दारी’ हा कथासंग्रह भेट दिला. तसेच समाजातील विविध गणमान्य व्यक्तींशी झालेल्या पत्रव्यवहाराचे संकलन असलेले ‘स्मृतिगंध’ हे पुस्तकही त्यांनी राज्यपालांना प्रदान केले.

नामजोशी यांनी लिहिलेली ‘भीमा’ ही कादंबरीदेखील राज्यपालांना भेट देण्यात आली. आदिवासी मुलीच्या कर्तृत्वाची आणि तिच्या आईच्या त्यागाची प्रेरणादायी कहाणी या कादंबरीत मांडण्यात आली आहे.

या भेटीदरम्यान साहित्य, लेखन आणि पुस्तक वाचनाच्या परंपरेविषयी विचारांची देवाणघेवाण झाली. पुस्तक वाचनाची संस्कृती अधिक व्यापक व्हावी आणि नव्या पिढीने वाचनाकडे आकर्षित व्हावे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावेत, असा संदेश यावेळी देण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.