उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन; अमित शाह यांच्या दौऱ्यात राहणार सहभागी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यात सहभागी होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विकासकामांच्या शुभारंभासह इचलकरंजीतील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

Jun 20, 2026 - 04:59
 0  1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन; अमित शाह यांच्या दौऱ्यात राहणार सहभागी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूर विमानतळ

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी, दि. १९ : पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शुक्रवारी कोल्हापूरमध्ये आगमन होणार आहे. या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी रात्री उशिरा ११ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.

विकासकामांच्या शुभारंभानंतर अमित शाह मंदिर परिसराची पाहणी करणार असून, पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर दुपारी सुमारे ११.३० वाजता ते पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

दुपारच्या सत्रात अमित शाह इचलकरंजी येथे जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होतील. तसेच शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता कल्लाप्पाणा आवाडे टेक्स्टाईल पार्क मैदान, इचलकरंजी येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कोल्हापूर विमानतळावरील आगमनावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर महानगरपालिका महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0