विकसित भारत’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवी दिशा; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन
सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालयात राज्यस्तरीय महाविद्यालयीन चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रतिनिधी: नरेश शिंदे
‘विकसित भारत’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवी दिशा; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन
‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत राज्यस्तरीय उपक्रम; गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव
मुंबई, दि. १२ ऑक्टोबर २०२६ : ‘विकसित भारत’ या संकल्पनेतून आयोजित राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनामुळे महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलात्मक अभिव्यक्तीला नवी दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
‘सेवा परमो धर्मः’ या विचारानुसार राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य कला संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महाविद्यालयीन चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालय येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण समारंभ चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, वास्तुविशारद राजीव मिश्रा यांच्यासह विद्यार्थी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातील शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपल्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा आणि कलात्मक अभिव्यक्तीचा आविष्कार घडविणाऱ्या कलाकृती साकारल्या.
स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट कलाकृतींच्या निर्मात्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांसह पाच प्रोत्साहनपर पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
नवोदित कलाकारांना आपल्या कलाकृती व्यापक स्तरावर सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
नवोदित कलाकारांना प्रोत्साहन
‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील कलात्मक अभिव्यक्ती, सर्जनशीलता आणि कला क्षेत्राविषयीची आवड वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रदर्शनातून राज्यातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या कलात्मक प्रवासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
१७ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन पाहण्याची संधी
मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालय येथे आयोजित हे चित्रकला प्रदर्शन शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाची वेळ दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
कलाप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.