येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण; सामाजिक न्याय व समतेचे प्रेरणास्थान – मंत्री छगन भुजबळ
येवला शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हे स्मारक सामाजिक न्याय, समता, श्रमिकांचा सन्मान आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रेरणादायी सांस्कृतिक केंद्र ठरणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक ब्यूरो
येवला : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि संघर्षाच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांना आवाज दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे येवला येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक हे सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाचे प्रतीक ठरणार असून, सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी सांस्कृतिक केंद्र म्हणून कार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला शहरात उभारण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
मंत्री भुजबळ म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ एक वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या वेदना, संघर्ष आणि स्वप्नांना प्रभावी शब्दरूप दिले. त्यांच्या विचारांमधून समाजातील उपेक्षित आणि कष्टकरी वर्गाला आत्मसन्मानाची प्रेरणा मिळाली.
“ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे,” हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले.
तसेच, “जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव” या ओळींतून अण्णाभाऊ साठे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रभावी प्रचार केला. समाजातील विषमता दूर करून सर्व घटकांना समान संधी मिळावी, हा विचार त्यांच्या साहित्य आणि शाहिरीतून सातत्याने अधोरेखित झाला, असेही भुजबळ यांनी सांगितले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय असल्याचे सांगताना मंत्री भुजबळ म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून मराठी अस्मिता जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या साहित्यकृतींनी सामान्य जनतेमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक जागृती निर्माण केली.
“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतिया काहिली” या गीतातून त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राच्या भावविश्वाचे प्रभावी चित्रण केले. त्यांच्या रचनांमधून समाजजीवनातील संघर्ष, वेदना, प्रेम, अस्मिता आणि परिवर्तनाची प्रेरणा यांचे जिवंत दर्शन घडते, असेही त्यांनी नमूद केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, कथा, पोवाडे, लावण्या, शाहिरी, लोकनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या साहित्यकृतींनी केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजातील अन्याय, विषमता आणि शोषणाविरोधात जनजागृती घडवून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली.
त्यांच्या गाजलेल्या ‘फकिरा’ या कादंबरीचा रशियन भाषेत अनुवाद होणे हा मराठी साहित्याच्या जागतिक दर्जाचा सन्मान आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला देश-विदेशात मिळालेली ही ओळख मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
येवला येथे उभारण्यात आलेले हे स्मारक भावी पिढीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक कार्याची ओळख करून देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून सामाजिक समता, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0