येरवडा खुले कारागृहात भव्य मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर; १०० हून अधिक बंदीजनांची तपासणी
महाराष्ट्र कारागृह विभागाच्या सुधारणा व पुनर्वसन धोरणांतर्गत येरवडा खुले कारागृह आणि डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात १०० हून अधिक बंदीजनांची तपासणी करण्यात आली.
मनिषा गुरव : चीफ एडिटर
पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ धोरणांतर्गत येरवडा खुले कारागृह येथे भव्य मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात १०० हून अधिक बंदीजनांच्या दातांची तपासणी करण्यात आली.
येरवडा खुले कारागृह आणि पुण्यातील डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. बंदीजनांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना आवश्यक उपचार आणि दंत आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हा उपक्रम डॉ. सुहास वारके (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे; योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच सुनील ढमाळ, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
शिबिराच्या प्रारंभी येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागेश एम. कांबळे यांनी डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजच्या वैद्यकीय पथकाचे स्वागत केले. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने बंदीजनांसह कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सखोल दंत तपासणी केली.
या शिबिरात डॉ. चैतन्य बुद्धिकोट आणि डॉ. सत्यम उपासे यांच्यासह इंटर्न डॉक्टर्स करन रावल, कविता चौधरी, आर्या कटीनिस आणि सहिबा खान यांनी विशेष योगदान दिले. तसेच इमरान अन्सारी यांनी अटेंडंट म्हणून, तर अजय काकडे यांनी वाहन चालक म्हणून सहकार्य केले.
शिबिराला बंदीजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १०० हून अधिक बंदीजनांच्या दातांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच दातांची स्वच्छता, तोंडाच्या आरोग्याची काळजी आणि दंतविकारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.
कारागृहातील बंदीजनांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि ‘सुधारणा व पुनर्वसन’ धोरण अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे अधीक्षक शामकांत शेडगे यांनी सांगितले. बंदीजनांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे उपक्रम मैलाचा दगड ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागेश कांबळे, तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे, निशा श्रेयकर, सुभेदार सुनील गायकवाड, चंद्रकांत खांदवे, बालाजी सावंत, हवालदार राजेंद्र धनगर, वैशाली थोरात, कारागृह महिला शिपाई मोनिका लांडगे, मिसबा सय्यद, सुरेखा म्हात्रे तसेच कारागृह शिपाई अशोक होले, विजयकुमार दिवेकर, याकुब शेख, महेंद्र लोहकरे आणि महेश हळदकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी कारागृहातील सर्व शिक्षाबंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंदीजनांच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष देत त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0