घाटकोपरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘मानवी मूलभूत हक्कांचा जल्लोष’ सोहळा उत्साहात
घाटकोपर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘मानवी मूलभूत हक्कांचा जल्लोष’ हा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.
उदय कासारे मुंबई (प्रतिनिधी): घाटकोपर येथील पोलिस हॉकी ग्राऊंड, माता रमाई नगर समोर येथे ११ एप्रिल २०२६ रोजी ‘मानवी मूलभूत हक्कांचा जल्लोष जयंतीचा’ हा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
भीमोत्सव समन्वय समिती, घाटकोपर, शहीद स्मारक समिती तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाचे वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त आणि महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष ठरले. यानिमित्त चवदार तळ्याचा प्रतीकात्मक देखावा साकारण्यात आला होता.
कार्यक्रमात फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गाण्यांनी वातावरण भारावून गेले, तर संदेश उमप यांच्या प्रबोधनात्मक गीतांनी उपस्थितांना सामाजिक संदेश दिला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. विजय कदम तसेच भीमोत्सव समन्वय समिती, घाटकोपर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0