जनगणना २०२७ साठी बुलढाण्यात तयारीला वेग; डिजिटल पद्धतीसाठी क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण
जनगणना २०२७ साठी बुलढाण्यात डिजिटल पद्धतीने तयारी सुरू. क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण; प्रशासन सज्ज.
बुलढाणा | दि. ११ एप्रिल २०२६ :
आगामी ‘जनगणना २०२७’ पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित पद्धतीने पार पडणार असल्याने बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय प्रशिक्षकांचे (फिल्ड ट्रेनर) प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले.
दि. ६ ते ११ एप्रिल दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण तीन टप्प्यांत पार पडले.
दि. १० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात तिसऱ्या बॅचचे प्रशिक्षण झाले. यामध्ये २१ प्रशिक्षार्थींना डिजिटल जनगणनेतील तांत्रिक बाबी, ॲपचा वापर आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यावेळी मास्टर ट्रेनर संजय खडसे आणि डॉ. रामेश्वर पुरी यांनी सखोल मार्गदर्शन केले.
जनगणना प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि CMMS पोर्टलवरील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ऋषीकेश वऱ्हाडे यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा समन्वयक ऋषीकेश वऱ्हाडे आणि नायब तहसीलदार प्रमोद करे यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरा केला. मोताळा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि शेगाव या भागांमध्ये भेट देऊन त्यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या डिजिटल उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0