शासकीय अनुभव साहित्यातून मांडणे काळाची गरज – विजया रहाटकर; अखिल भारतीय मराठी महिला प्रशासकीय साहित्य संमेलनाचा समारोप
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी महिला प्रशासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार समारोप झाला. विजया रहाटकर यांनी प्रशासकीय अनुभव साहित्यातून मांडण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
नवी दिल्ली, दि. १२: प्रशासकीय सेवेत मिळणारे विविध आणि समृद्ध अनुभव समाजासमोर साहित्यातून मांडणे ही काळाची गरज असल्याचे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.
नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सदन आणि ‘सरहद’ संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी महिला प्रशासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा लीना मेहंदळे, स्वागताध्यक्षा सुप्रिया देवस्थळी, निवासी आयुक्त आर. विमला, श्वेता सिंघल, सुषमा संजय नहार, पगारिया आणि लेशपाल जवळगे उपस्थित होते.
विजया रहाटकर यांनी महिला अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कौशल्यासोबत त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचेही कौतुक केले. राजमाता जिजाऊ आणि महाराणी ताराराणी यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, आजच्या महिला अधिकारी त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत आहेत.
प्रशासकीय जीवनातील अनुभव कथा, कविता किंवा लेखनाच्या माध्यमातून व्यक्त झाले, तर ते समाजपरिवर्तनाचे दस्तऐवज ठरतात. तंत्रज्ञानाच्या युगातही मानवी संवेदनशीलता टिकवण्यासाठी साहित्य महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
स्वागताध्यक्षा सुप्रिया देवस्थळी यांनी महिला अधिकाऱ्यांच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. संमेलनाध्यक्षा लीना मेहंदळे यांनी अधिकाऱ्यांनी सर्जनशीलता जपण्याचे आवाहन केले, तर आर. विमला यांनी प्रशासन आणि साहित्य यांचा संगम समाजासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात साहित्य संमेलनासाठी योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन निरजा आपटे यांनी केले तर आभार प्रदर्शन लेशपाल जवळगे यांनी केले.
या दोन दिवसीय संमेलनातून प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0