प्रशासकीय महिलांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून ‘महिला सक्षमीकरणा’चा बुलंद आवाज
नवी दिल्ली येथे झालेल्या प्रशासकीय महिलांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महिला सक्षमीकरण, प्रशासनातील भूमिका आणि मराठी भाषा-संस्कृतीवर सखोल चर्चा झाली. आश्विनी भिडे यांच्यासह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
नवी दिल्ली, दि. १२: महिलांमध्ये काम करण्याची प्रचंड क्षमता असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद त्यांच्यात आहे. प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःला केवळ महिला म्हणून न पाहता सक्षम अधिकारी म्हणून सिद्ध करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले.
नवी दिल्ली येथे आयोजित प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. या संमेलनात प्रशासन, भाषा, संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली.
‘सृजनाची मुक्त झेप : स्वप्न आणि वास्तव’ या विशेष सत्रात दैनिक पुढारीच्या वरिष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी आश्विनी भिडे यांची ऑनलाइन मुलाखत घेतली. यावेळी भिडे यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर, लोकांशी थेट संवाद, वर्क-लाईफ बॅलन्स आणि टीम बिल्डिंग यावर भर दिला. मेट्रोसारखे मोठे प्रकल्प टीमवर्कमुळेच यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
परराज्यात सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीशी जुळवून घेतलेला प्रवास मांडला. राधिका रस्तोगी यांनी मराठी साहित्याच्या अनुवादाची गरज व्यक्त केली, तर सुमन रावत यांनी ‘जोगवा’ आणि ‘उंबरठा’सारख्या चित्रपटांतून महाराष्ट्राची संस्कृती अनुभवता येते असे सांगितले. श्वेता सिंघल यांनी मराठी संस्कृतीशी जुळलेली आपली नाळ व्यक्त केली.
भाषा, संस्कृती आणि प्रशासन या विषयावरील परिसंवादात अनुपमा निलेकर, प्रतिभा पारकर आणि रोहिणी भाजीभाकरे यांनी अनुभव मांडले. विविध राज्यांमध्ये मराठी संस्कृती जपली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
‘महिला सक्षमीकरण : संधी, आव्हाने आणि दिशा’ या सत्रात रेखा रायकर, कीर्ती पांडे, डॉ. निशा चव्हाण आणि कविता पाटील यांनी महिलांच्या प्रशासकीय भूमिकांवर मार्गदर्शन केले.
या संमेलनात प्रशासन आणि मराठी साहित्य यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0