महात्मा फुले यांचा स्त्रीशिक्षणाचा विचार आजही मार्गदर्शक – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. स्त्रीशिक्षणाचा फुले यांचा विचार आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
पुणे प्रतिनिधी - रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ११ एप्रिल २०२५: क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा जो पाया घातला, तो भारतीय समाज परिवर्तनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून त्यांचा विचार आजही मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने महात्मा फुले यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि महिलांना ज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. आज स्त्रिया विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असून ही प्रगती फुले यांच्या विचारांचेच फलित आहे.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे संवर्धन पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या विचारांची रुजवण व्हावी यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही फुले यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. तसेच पिंपरीतील भीमसृष्टी परिसरातील स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चौकट :
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक समता सप्ताह’ व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत सावित्रीबाई फुले स्मारक येथे ११ ते १५ एप्रिल दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0