रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी ३१ फिरती पथके कार्यान्वित होणार; मंत्री आदिती तटकरे यांचे संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश
रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचा शोध, संरक्षण आणि पुनर्वसनासाठी राज्यातील २८ महानगरपालिका क्षेत्रांसह मुंबईतील तीन क्षेत्रांमध्ये एकूण ३१ फिरती पथके कार्यान्वित करण्यात येणार.
प्रतिनिधी मानवी शिंदे
मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२६ : रस्त्यावर राहणाऱ्या आणि बाल भिक्षेकरीच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या बालकांचे संरक्षण, सुरक्षितता आणि पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने राज्यात एकूण ३१ फिरती पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
या योजनेची अंमलबजावणी जलदगतीने सुरू करून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
२८ महानगरपालिका क्षेत्रांसह मुंबईत तीन पथके
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजना कायमस्वरूपी सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
राज्यातील २८ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक पथक, तर बृहन्मुंबई शहर, मुंबई उपनगर पूर्व आणि मुंबई उपनगर पश्चिम या तीन क्षेत्रांसाठी प्रत्येकी एक पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. अशा प्रकारे राज्यभरात एकूण ३१ फिरती पथके कार्यरत होणार आहेत.
या पथकांच्या निवड प्रक्रियेसह आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून योजना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बालकांच्या सुरक्षिततेला आणि पुनर्वसनाला प्राधान्य
रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचा शोध घेणे, त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना करणे, हे या फिरत्या पथकांचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
बालकांच्या हिताशी संबंधित असलेल्या या योजनेची अंमलबजावणी करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, जबाबदारी आणि मानवतावादी दृष्टिकोनातून काम करावे, असे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक बालकाला सुरक्षितता, संरक्षण आणि पुनर्वसनाची संधी मिळेल, यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे. बाल भिक्षेकरीची समस्या केवळ नियंत्रणात आणण्याऐवजी तिच्या मुळाशी जाऊन बालकांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवनाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
चिल्ड्रन एड सोसायटीच्या कामकाजाचाही आढावा
दरम्यान, चिल्ड्रन एड सोसायटीचे २०२६-२७ हे शताब्दी वर्ष असल्याच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आयोजित स्वतंत्र बैठकीत सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
या बैठकीस महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमण हटवून सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश
चिल्ड्रन एड सोसायटीच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने काढण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच उपलब्ध जागेचा विचार करून या ठिकाणी भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांचा सुधारित आराखडा सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
बैठकीत सोसायटीतील रिक्त पदे भरणे, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढणे, कार्यकारी समितीची बैठक घेणे, नवीन आकृतिबंधाचा प्रस्ताव पाठवणे यासह माटुंगा येथील कर्मचारी वसाहतीतील जागेबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
बालकांच्या संरक्षण आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच संबंधित संस्थांची प्रशासकीय क्षमता मजबूत करण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0