स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ४० उमेदवार अपात्र; निवडणूक खर्चाचा हिशोब न दिल्याने कारवाई
पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर न केल्यामुळे पुणे महानगरपालिका, पंढरपूर आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील ४० उमेदवारांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
पुणे | प्रतिनिधी
पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर न केल्यामुळे एकूण ४० उमेदवारांना पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये:
पुणे महानगरपालिका – २२ उमेदवार
पंढरपूर नगरपरिषद – १५ उमेदवार
अक्कलकोट नगरपरिषद – ३ उमेदवार
असा समावेश आहे.
ही अपात्रता २६ मे २०२६ पासून पुढील तीन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील ६० नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी, तर ६ महानगरपालिकांच्या निवडणुका १४ जानेवारी २०२६ रोजी पार पडल्या होत्या.
या निवडणुकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील विहित ३० दिवसांच्या मुदतीत सादर केला नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
याप्रकरणी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावांच्या आधारे ५ आणि २५ मे २०२६ रोजी सुनावणी प्रक्रिया पार पडली.
सुनावणीदरम्यान संबंधित उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उपआयुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली.
निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्याबाबतच्या कायदेशीर तरतुदींचे पालन न केल्यास उमेदवारांना अपात्रतेला सामोरे जावे लागू शकते, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1