अमृताहुनी गोड’मधून ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान; ७ सप्टेंबरला विलेपार्लेत स्वरसोहळा

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ७ सप्टेंबरला विलेपार्ले येथे ‘अमृताहुनी गोड’ या विशेष स्वरसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीधर फडके, उत्तरा केळकर, रवींद्र साठे यांच्यासह ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

अमृताहुनी गोड’मधून ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान; ७ सप्टेंबरला विलेपार्लेत स्वरसोहळा
अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड कार्यक्रम, ज्येष्ठ संगीत कलाकार, संगीत कलाकारांचा सन्मान, विलेपार्ले कार्यक्रम,

प्रतिनिधी: देवानंद शिंदे 

७५ वर्षे पूर्ण केलेल्या किंवा ७५व्या वर्षात पदार्पण केलेल्या संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव; प्रवेश विनामूल्य

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर कलाकारांच्या सन्मानार्थ ‘अमृताहुनी गोड’ या विशेष स्वरसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२५-२६ मध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा ७५व्या वर्षात पदार्पण केलेल्या संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

ज्येष्ठ कलावंतांच्या सांगीतिक योगदानाला उजाळा

संगीत क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करणे, त्यांच्या कलाकृतींचे स्मरण करणे आणि त्यांच्या सांगीतिक योगदानाची ओळख नव्या पिढीला करून देणे, हा ‘अमृताहुनी गोड’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ संगीत मान्यवरांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाला उजाळा देण्यात येणार असून, त्यांनी गायलेल्या, स्वरबद्ध केलेल्या तसेच संगीत संयोजन केलेल्या निवडक गीतांचे आणि नृत्याचे विशेष सादरीकरण करण्यात येणार आहे.

श्रीधर फडके, उत्तरा केळकर, रवींद्र साठे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग

‘अमृताहुनी गोड’ या कार्यक्रमात श्रीधर फडके, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, भीमराव पांचाळे, अजित कडकडे, डॉ. मंजिरी देव आणि अप्पा वढावकर यांचा सन्मानार्थी व विशेष सहभागी म्हणून सहभाग असणार आहे.

या ज्येष्ठ कलाकारांच्या कलाप्रवासातील निवडक गायन, स्वररचना आणि संगीताशी संबंधित कलाकृतींचे सादरीकरण कार्यक्रमादरम्यान करण्यात येणार आहे.

नामवंत गायकांचे सादरीकरण

या स्वरसोहळ्यात मंदार आपटे, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, शार्दुल कवठेकर, प्राजक्ता सातर्डेकर आणि ओंकार प्रभूघाटे हे गायक कलाकार सादरीकरण करणार आहेत.

कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी करणार असून, सागर साठे संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

याशिवाय डॉ. मंजिरी देव यांच्या शिष्यांचे नृत्य सादरीकरण हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि ज्येष्ठतम कलावंतांच्या योगदानाचा गौरव करणे, त्यांच्या प्रदीर्घ कलासाधनेचा वारसा जतन करणे आणि हा वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

प्रवेश विनामूल्य; ६ सप्टेंबरपासून शिल्लक प्रवेशिका उपलब्ध

‘अमृताहुनी गोड’ कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. शिल्लक प्रवेशिका रविवार, ६ सप्टेंबर २०२६ पासून नाट्यगृहावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कार्यक्रमातील काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ संगीत मान्यवरांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या प्रदीर्घ सांगीतिक योगदानाला समर्पित या विशेष स्वरसोहळ्याचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.