विरोधी पक्ष ही भाजपची ‘बी’ टीम – चेतन पवार यांची टीका

पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्ष प्रभावी भूमिका घेत नसल्याची टीका करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष चेतन पवार यांनी विरोधकांना भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप केला.

May 6, 2026 - 22:38
 0  5
विरोधी पक्ष ही भाजपची ‘बी’ टीम – चेतन पवार यांची टीका
चेतन पवार, पिंपरी चिंचवड राजकारण, शिवसेना उद्धव ठाकरे,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष सक्षमपणे भूमिका बजावत नसून तो भाजपसोबत सत्तेत सहभागी असल्यामुळे तो ‘बी’ टीमप्रमाणे काम करत आहे, अशी टीका चेतन पवार यांनी केली. ते पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रातील सत्तास्थितीचा संदर्भ देत त्यांनी विरोधी पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी असल्याने स्थानिक पातळीवरही तो प्रभावी विरोध करत नसल्याचा आरोप केला.

यावेळी उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, विधानसभा प्रमुख तुषार नवले, उपशहर प्रमुख अमोल निकम, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पत्रकार परिषदपूर्वी शिवसेनेच्या वतीने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील नसरापूर आणि सहकारनगर परिसरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला.

पत्रकार परिषदेत बोलताना चेतन पवार यांनी पुढे सांगितले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत शिवसेनेची स्थापना केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आगामी काळात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांना एकत्र करून नवीन शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यावर भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी शिवसेनेचे स्वतंत्र प्रतिनिधी मंडळ नेमण्यात येणार आहे. महापालिकेतील कथित भ्रष्टाचार, कर्जबाजारी स्थिती आणि अलीकडील आर्थिक गैरव्यवहारांबाबत माहिती घेऊन न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महिला सुरक्षा, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि अतिक्रमण यांसारख्या प्रश्नांवर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगत, भाजप आणि विरोधी पक्षांचा “खरा चेहरा” जनतेसमोर आणण्याचा दावा त्यांनी केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0