गडचिरोलीचा स्वतंत्र कृषी ब्रँड विकसित करा; स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यावर भर – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र ब्रँड विकसित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. पीएमएफएमई, क्रॉपसॅप आणि कपास कांती अभियानाबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली.

Jul 15, 2026 - 23:40
 0  2
गडचिरोलीचा स्वतंत्र कृषी ब्रँड विकसित करा; स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यावर भर – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली, अविश्यांत पंडा, पीएमएफएमई, PMFME, क्रॉपसॅप, CropSAP,

गडचिरोली | प्रतिनिधी : राजेंद्र किनाके 

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना राज्यासह देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याचा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण कृषी ब्रँड विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर क्रॉपसॅप (CropSAP), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) आणि कपास कांती अभियान अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.

कार्यशाळेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), क्रॉपसॅप, कपास कांती अभियान, ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (AIF) तसेच शेतीतील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सांगितले की, खरीप हंगामाच्या तयारीसाठी आयोजित ही कार्यशाळा कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेचे सक्षमीकरण, पीक संरक्षणाबाबत वेळेवर मार्गदर्शन, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक मधुगंधा गौतम-जुलमे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची कार्यपद्धती, उद्दिष्टे, लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि अंमलबजावणी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.

विस्तार विभागाचे तांत्रिक अधिकारी गणेश दुरंदे यांनी 'क्रॉपसॅप २.०' ॲप विषयी तांत्रिक सादरीकरण केले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीक पाहणी, माहिती संकलन आणि शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक सल्ला प्रभावीपणे पोहोचविण्याची प्रक्रिया त्यांनी स्पष्ट केली.

प्रकल्प उपसंचालक (आत्मा) रवी हरणे यांनी ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (AIF) योजनेअंतर्गत कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी उपलब्ध आर्थिक सहाय्य, योजनेची उद्दिष्टे आणि शेतकऱ्यांनी या योजनेचा प्रभावी लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले.

अन्न सुरक्षा अधिकारी जितेंद्र कुंजाम यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी आवश्यक परवाने, अन्न सुरक्षा मानके, नोंदणी प्रक्रिया आणि दर्जेदार अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर माहिती दिली.

यावेळी पीक संरक्षणाच्या दृष्टीने खरीप पिकांवरील विविध कीड व रोगांची ओळख, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वैज्ञानिक व्यवस्थापनाबाबत डॉ. प्रीतम चिरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या जिल्हास्तरीय कार्यशाळेला कृषी विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक शेतीला चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0