पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने दूरदर्शी शिक्षण व समाजसेवेचे नेतृत्व हरपले – मंत्री हसन मुश्रीफ
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शोक व्यक्त केला. शिक्षण, सामाजिक कार्य, सहकार आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे मुश्रीफ यांनी म्हटले.
प्रतिनिधी: उमेश जाधव
मुंबई, दि. ४ : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाचा दीप ग्रामीण भागापर्यंत पोहोचवत लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांचे योगदान महाराष्ट्रासह देशाच्या शैक्षणिक विकासात कायम स्मरणात राहील, असे मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेल्या विविध शैक्षणिक संस्था दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवेची उत्कृष्ट केंद्रे बनली. या संस्थांमधून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून, वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्राच्या विकासातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्रातही डॉ. डी. वाय. पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे आणि समाजाभिमुख कार्यामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी उभारलेला शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी कार्याचा व्यापक वारसा भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केले.
“डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी आणि समाजसेवेचा वारसा भावी पिढ्यांना सातत्याने प्रेरणा देत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे,” अशा भावना मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या.
ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना तसेच असंख्य विद्यार्थी व अनुयायांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0