कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवडमधील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पामुळे युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. महापौर रवि लांडगे यांनी प्रकल्पाची पाहणी करत युवकांना सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांचा विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Apr 17, 2026 - 17:24
 0  1
कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी – महापौर रवि लांडगे
कौशल्यम लाईटहाऊस, पिंपरी चिंचवड बातम्या, युवक रोजगार, रवि लांडगे,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १६ एप्रिल २०२६: कौशल्यम लाईटहाऊससारख्या प्रकल्पांमुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून अशा उपक्रमांचा विस्तार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी केले.

निगडी येथील यमुनानगर परिसरातील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाची पाहणी करताना त्यांनी प्रशिक्षण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रकल्पातील यशस्वी युवकांशी संवाद साधत त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.

महापौर लांडगे म्हणाले की, बदलत्या काळानुसार कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असून अशा उपक्रमांमुळे युवकांना केवळ नोकरीच नव्हे, तर स्वावलंबी होण्याची संधी मिळते. भविष्यात अशा प्रकल्पांचा विस्तार करून अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य उत्तम केंदळे, अनिल घोलप, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, लाईटहाऊस कम्युनिटीजच्या सीईओ अमृता बहुलेकर, प्रकल्प प्रमुख दीपिका केडिया यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात नोकरी मिळवलेल्या युवक-युवतींचा सत्कार करण्यात आला. शिवमूर्ती सोनटक्के, सुमेधा ढाके, सुमित कुंभकरण, शंकर प्रसाद, रुचा लोंढे, अक्षय माने तसेच स्किल कोर्स पूर्ण केलेल्या ओम सुर्वे, सचिन जाधव, प्रीती कोळेकर आणि आरती होलाडे यांचा गौरव करण्यात आला.

कौशल्य विकासाच्या माध्यमातून शहरातील अधिकाधिक युवकांना सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0