महाराष्ट्रातील ६० कुशल बांधकाम कामगारांची पहिली तुकडी ३ सप्टेंबरला इस्रायलला रवाना; दरमहा सुमारे २ लाखांचे वेतन
इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील १०३ कुशल बांधकाम कामगारांपैकी ६० जणांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईहून रवाना होणार आहे. कामगारांना दरमहा सुमारे २ लाख रुपये वेतन, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षित रोजगाराची संधी मिळणार आहे.
प्रतिनिधी:नरेश शिंदे
महाराष्ट्रातील ६० कुशल बांधकाम कामगारांची पहिली तुकडी ३ सप्टेंबरला इस्रायलला रवाना
मुंबई, दि. २ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगाराचे नवे दालन खुले झाले असून, इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या १०३ बांधकाम कामगारांपैकी ६० जणांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईहून इस्रायलला रवाना होणार आहे. आगामी काळात उर्वरित कामगारांना टप्प्याटप्प्याने इस्रायलमध्ये रोजगारासाठी पाठविण्यात येणार आहे.
इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा. भारतीय संस्कृतीचा आदर राखत शिस्त, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता जपावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
‘महाराष्ट्राची कौशल्यशक्ती आता जगभर’ उपक्रम
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘महाराष्ट्राची कौशल्यशक्ती आता जगभर’ या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या आणि ३ सप्टेंबर रोजी रवाना होणाऱ्या कुशल बांधकाम कामगारांशी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संवाद साधला.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) आणि NSDC International यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
इस्रायलमध्ये सुमारे २ लाख रुपये मासिक वेतन
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांना दरमहा सुमारे दोन लाख रुपये वेतन, वैद्यकीय सुविधा तसेच शासकीय स्तरावरील सुरक्षित रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
युवकांना त्यांच्या ITI प्रशिक्षणासोबतच इस्रायलमधील रोजगारासाठी आवश्यक विशेष प्रशिक्षण राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्यामुळे निवड झालेले युवक संबंधित रोजगारासाठी अधिक सक्षम झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये कौशल्य विकास क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असेही लोढा यांनी नमूद केले.
बांधकाम क्षेत्रातील चार व्यवसायांसाठी निवड
भारत आणि इस्रायल सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या उपक्रमासाठी बांधकाम क्षेत्रातील पुढील चार व्यवसायांतील कामगारांची निवड करण्यात आली आहे—
गिलावा काम (Plastering)
सिरेमिक फरशी बसविणे (Ceramic Tiling)
इमारतींचे सांगाडे/फ्रेमवर्क तयार करणे (Framework)
लोखंड वाकविणे (Iron Bending)
या क्षेत्रांमध्ये कौशल्य असलेल्या कामगारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराची संधी मिळत आहे.
चार लाख कामगारांची छाननी; ७८३ उमेदवारांना अंतिम मान्यता
या उपक्रमासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत सुमारे ४ लाख कामगारांची छाननी करण्यात आली.
राज्यातील १२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून खुल्या कॅम्पस भरतीद्वारे उमेदवारांपर्यंत पोहोचण्यात आले. याशिवाय ३ लाखांहून अधिक कामगारांशी दूरध्वनी आणि लघुसंदेशाद्वारे संपर्क साधण्यात आला.
या प्रक्रियेनंतर ९९७ उमेदवारांची निवड करण्यात आली. वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी आणि इस्रायली नाव पडताळणी प्रक्रियेनंतर ७८३ उमेदवारांना अंतिम मान्यता मिळाली आहे. या उमेदवारांचे टप्प्याटप्प्याने इस्रायलमध्ये रोजगारासाठी प्रस्थान नियोजित करण्यात आले आहे.
इस्रायली मानकांनुसार प्रशिक्षण
निवड झालेल्या उमेदवारांना इस्रायलमधील कामाच्या आवश्यकतांनुसार प्रशिक्षण देण्यात आले. २२ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत इस्रायली प्रशिक्षकांनी प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम घेतला.
यानंतर १०३ उमेदवारांनी इस्रायली मानकांनुसार रिफ्रेशर प्रशिक्षण पूर्ण केले. याच १०३ कामगारांपैकी ६० कामगारांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर रोजी मुंबईहून इस्रायलसाठी रवाना होणार आहे.
हे कामगार तेल अवीव येथे काम करणार आहेत.
प्रवासपूर्व मार्गदर्शन आणि कागदपत्रांचे वितरण
इस्रायलला रवाना होणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी प्रस्थानपूर्व मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी कामगारांना प्रवासासंदर्भातील आवश्यक माहिती देण्यात आली.
तसेच कामगारांना आवश्यक प्रवासाची कागदपत्रे, व्हिसा आणि विमान तिकिटांचे वितरण करण्यात आले.
आतापर्यंत ६,७०० हून अधिक भारतीय कामगार इस्रायलमध्ये
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे महाराष्ट्रातील कामगारांचे अभिनंदन केले.
इस्रायलमध्ये कुशल बांधकाम कामगारांची मोठी मागणी असून, त्यामुळे भारतीय तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. NSDC, इस्रायलचे लोकसंख्या आणि स्थलांतर प्राधिकरण तसेच विविध राज्य सरकारांच्या सहकार्याने आतापर्यंत ६,७०० हून अधिक भारतीय कामगार इस्रायलमध्ये यशस्वीरित्या पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
तरुणांना उद्योगाभिमुख कौशल्ये देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे जयंत चौधरी यांनी सांगितले.
२९ सप्टेंबरला राज्यभर रोजगार मेळावे
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी राज्यातील युवकांसाठी आगामी रोजगार उपक्रमांचीही माहिती दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत २९ सप्टेंबर रोजी राज्यभरातील एक हजार ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या सर्व युवकांना मंत्री लोढा यांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त अमित सैनी, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे अवर सचिव चंद्रहंस राठोड, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व NSDC Internationalचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सिन्हा, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळाचे संचालक योगेश पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांना थेट आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम राज्यातील कौशल्य विकासाला जागतिक रोजगार बाजारपेठेशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0