जनगणना प्रशिक्षण शिबिरात शौचालयाशेजारी जेवणाची व्यवस्था; आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचे आरोप

मुंबईतील सांताक्रुझ येथील प्रभात कॉलनी महानगरपालिका शाळेत जनगणना 2027 प्रशिक्षण शिबिरादरम्यान शौचालयाशेजारी जेवणाची व्यवस्था केल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून चौकशीची मागणी होत आहे.

Apr 25, 2026 - 18:10
 0  9
जनगणना प्रशिक्षण शिबिरात शौचालयाशेजारी जेवणाची व्यवस्था; आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचे आरोप
सांताक्रुझ , शौचालयाशेजारी जेवण, आरोग्य विभाग

मुंबई  प्रतिनिधी- उदय कासारे 

भारतीय जनगणना 2027 च्या पूर्वतयारीसाठी सांताक्रुझ येथील प्रभात कॉलनी महानगरपालिका शाळेत आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण शिबिर सध्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. प्रशिक्षणार्थींना शौचालयाशेजारी ठेवलेले अन्न देण्यात आल्याचा आरोप समोर आला असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

नेमका प्रकार काय?

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच/पूर्व विभागामार्फत 23 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य सेविका, शिक्षक आणि पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रशिक्षणादरम्यान सहभागींसाठी सकाळचा अल्पोपहार, दुपारचे जेवण आणि सायंकाळच्या चहाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, हे खाद्यपदार्थ ठेवण्यात आलेल्या जागेजवळच शाळेचे शौचालय असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष?

लोकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली कार्यक्रम होत असताना स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष झाल्याची टीका होत आहे. शौचालयालगत अन्नसाहित्य ठेवल्यामुळे सहभागींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

चौकशीची मागणी

या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था आणि काही राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

पालिका प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि पुढे काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0