ज्ञानेश्वरी लिहिली गेली, शिवरायांसारखे राजे होऊन गेले त्या भाषेला अभिजाततेच्या दर्जाची गरज नाही; ती मुळातच अभिजात’ – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर
अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेचा गौरव करत आपल्या संगीतसाधनेतील मराठी काव्याच्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ३ ऑक्टोबर २०२६ : “ज्या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला गेला आणि ज्या मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होऊन गेले, त्या भाषेला अभिजाततेचा वेगळा दर्जा देण्याची गरजच नाही. ती भाषा मुळातच अभिजात आहे,” असे प्रतिपादन पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले.
अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रविंद्र, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रतिनिधी तुषार झरेकर, किशोर बर्गडे, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘अभिजात मराठीतील काव्याला स्वरबद्ध करण्याचा प्रयत्न केला’
पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की, मराठी भाषेतील अभिजात काव्याला स्वरबद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा मला अभिजात काव्य सापडत गेले, तेव्हा त्याला चाली देत गेलो. कविता मला अंतर्मुख करते.
“माझ्या बालपणी आई गावाकडच्या अनेक गोष्टी सांगायची. त्यानंतर तिने मला पुस्तके वाचून दाखवण्यास सुरुवात केली. माझ्या हातात आलेले पहिले पुस्तक एक नाटक होते आणि त्याचे लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्या काळात कानावर पडणाऱ्या भाषेच्या सौंदर्याने माझ्या मनावर खोल संस्कार झाले. शब्द, भाषा आणि स्वर यांचे नाते तेव्हापासूनच मनात रुजत गेले,” असे त्यांनी सांगितले.
‘संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणण्यामागे भाषेचेही वैभव’
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा उल्लेख करताना सांगितले की, “स्वरांची माऊली आहे, शब्दांची माऊली आहे आणि भाषेचीही एक माऊली आहे.”
संत ज्ञानेश्वरांना लोक ‘माऊली’ म्हणू लागले, कारण ते ज्या भाषेला टेकून बसले होते, त्या भाषेने असंख्य लोकांना ज्ञान आणि भावविश्व दिले. त्या भाषेचे वैभव अनुभवताना तिच्याप्रती असलेली कृतज्ञता अधिक दृढ होते, असे त्यांनी नमूद केले.
लता मंगेशकर यांच्या आशीर्वादाचा संगीतसाधनेत मोठा वाटा
आपल्या संगीतप्रवासात मंगेशकर कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या मोठ्या भगिनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आशीर्वादाचा आपल्या संगीतसाधनेत मोठा वाटा असल्याचे सांगितले. तसेच आपली मोठी बहीण शारदा यांचा उल्लेखही त्यांनी केला.
मंगेशकर कुटुंबातून मिळालेला सांगीतिक वारसा आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान असल्याचे सांगत, अभिजात मराठी भाषा दिवस आणि सप्ताहाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केलेला सन्मान हा आपल्यासाठी जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या सन्मानाबद्दल त्यांनी महानगरपालिकेचे मनःपूर्वक आभार मानले.
‘पंडितजींच्या उपस्थितीने सोहळ्याची उंची वाढली’ – विक्रांत बगाडे
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले की, पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महान कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला लाभले, ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या उपस्थितीमुळेच या सोहळ्याची उंची मोठी झाली आहे.
हृदयनाथ मंगेशकर यांच्या कर्तृत्वाची आणि संगीतसाधनेची व्याप्ती शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला तरी शब्दांना मर्यादा आहेत; मात्र त्यांच्या संगीताला आणि कलेला सीमा नाहीत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
त्यांचे मार्गदर्शन, सहवास आणि कलेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहो, अशी सदिच्छाही बगाडे यांनी व्यक्त केली.
‘अभिजातत्वाचा गौरव दैनंदिन जीवनात दिसला पाहिजे’
विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
“मराठी भाषेला मिळालेला अभिजाततेचा गौरव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारात आणि पुढील पिढ्यांच्या संस्कारांमध्ये दिसला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विविध सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतप्रवासाचा गौरव करताना गायकवाड यांनी त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक, लोकसंगीताची मातीशी जोडलेली सहजता, पाश्चात्त्य संगीताची प्रयोगशीलता आणि मराठी शब्दांविषयीची संवेदनशीलता असल्याचे नमूद केले.
वृत्त छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
या कार्यक्रमादरम्यान पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले की, पत्रकारितेमध्ये वृत्त छायाचित्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अनेकदा एक छायाचित्र संपूर्ण बातमी सांगून जाते. घटनेचा संदर्भ, गांभीर्य आणि वास्तव प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम वृत्त छायाचित्रकार करतात.
या प्रदर्शनात माध्यम प्रतिनिधींनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेल्या विविध घटना आणि प्रसंगांचे छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कलादालनात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पत्रकारितेतील या महत्त्वपूर्ण योगदानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन राजेंद्र पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मानले. मानपत्राचे वाचन किरण गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.