डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार आचरणात आणणे काळाची गरज – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन; महापौर रवि लांडगे यांनी त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १४ एप्रिल २०२६ :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी आंबेडकरांच्या विचारांचे आचरण करणे ही आजच्या पिढीची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा विचार हा आपल्या संविधानाचा पाया आहे. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या मंत्रामुळे समाजात मोठे परिवर्तन घडले असून आजच्या पिढीने हे विचार केवळ स्मरणात न ठेवता प्रत्यक्ष जीवनात उतरवावेत.
यावेळी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत, भीमसृष्टी तसेच एच. ए. कॉलनी आणि दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, माजी महापौर योगेश बहल, तसेच अनेक नगरसदस्य, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ११ ते १७ एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ आणि ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौरांनी केले.
याचबरोबर, एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भीमसृष्टी परिसरात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. आकाशातून झालेल्या या पुष्पवृष्टीमुळे परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या अनोख्या उपक्रमावेळी महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्याचा आनंद घेत डॉ. आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0