पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; सुरक्षा रखवालदारांना थेट सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समितीने सुरक्षा रखवालदारांना सुरक्षा सुपरवायझरऐवजी थेट सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार असून बैठकीत होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट आणि महसूलवाढीवरही चर्चा झाली.

Jun 29, 2026 - 01:17
 0  1
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; सुरक्षा रखवालदारांना थेट सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सुरक्षा रखवालदार पदोन्नती, सुरक्षा

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुरक्षा रखवालदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या सुरक्षा रखवालदारांना सुरक्षा सुपरवायझरऐवजी थेट सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी तो महापालिका सभेसमोर सादर करण्यात येणार आहे.

विधी समितीच्या सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी पदोन्नतीस पात्र सुरक्षा रखवालदारांना प्रथम सुरक्षा सुपरवायझर पदावर पदोन्नती दिली जात होती. त्यानंतर पात्र सुरक्षा सुपरवायझर यांना सुरक्षा निरीक्षक पदावर बढती मिळत होती. मात्र, नव्या ठरावानुसार सुरक्षा सुपरवायझर आणि सुरक्षा निरीक्षक या दोन्ही पदांचे समायोजन करून सुरक्षा निरीक्षक हे एकच पद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पात्र सुरक्षा रखवालदारांना थेट सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे.

बैठकीस विधी समिती सदस्य तथा नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे, नगरसचिव उल्हास जगताप तसेच महापालिकेचे उपायुक्त राजेश आगळे, सिताराम बहुरे, संदीप खोत, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याशिवाय बैठकीत शहरातील होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिट, महापालिकेच्या महसूलवाढीचे उपाय तसेच महापालिकेच्या ताब्यातील उपलब्ध जागांच्या वापराबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेला अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0