पीसीयूमध्ये देशातील पहिल्या ‘कोसमे पुणे बेस कॅम्प’चे उद्घाटन; भारत-कोरिया औद्योगिक सहकार्याला नवी दिशा
पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) देशातील पहिल्या ‘कोसमे पुणे बेस कॅम्प’चे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे भारत-दक्षिण कोरिया आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक सहकार्याला चालना मिळणार असून विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रासाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ४ जून २०२६ : भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि कोरिया एसएमइ अँड स्टार्टअप एजन्सी (कोसमे) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या ‘कोसमे पुणे बेस कॅम्प’चे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी कोरिया प्रजासत्ताकाचे महावाणिज्य दूत डोंगवान यू यांनी पीसीयू-कोसमे कराराला भारत-कोरिया संबंध अधिक बळकट करणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. भारतातील कोरियन लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी कोसमे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून पीसीयूतील हा देशातील एकमेव बेस कॅम्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
साते, वडगाव मावळ येथील पीसीयू परिसरात झालेल्या या कार्यक्रमात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कोसमेचे प्रादेशिक संचालक सुसोक पार्क, व्यवस्थापकीय संचालक जेक्यॉन्ग ली, किटाचे मुख्य व्यापार प्रतिनिधी योंग यून, सीईपीएचे संचालक सेउंगचांग हा, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, स्टाराजीन कंपनीच्या सीईओ युजिन हान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी विकसित भारताच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि रोजगार विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोसमेच्या भारतातील पहिल्या बेस कॅम्पमुळे महाराष्ट्रात कोरियन गुंतवणुकीचा वेग वाढेल आणि विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स तसेच उद्योग क्षेत्रासाठी नवी दारे खुली होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“पीसीयूची वाटचाल आता भारतातील पहिले औद्योगिक विद्यापीठ होण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. हा करार केवळ शैक्षणिक नाही, तर उद्योग, रोजगार आणि संशोधन क्षेत्रासाठीही मैलाचा दगड ठरणार आहे,” असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
महावाणिज्य दूत डोंगवान यू यांनी कोरियन भाषा प्रशिक्षण, प्राध्यापक देवाणघेवाण, विद्यार्थी कौशल्य विकास, संशोधन, स्टार्टअप इनक्युबेशन, उत्पादन चाचणी सुविधा आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्य यांसारखे अनेक उपक्रम या केंद्रातून राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी या केंद्रामुळे महाराष्ट्रात कोरियन उद्योग आणि गुंतवणुकीला चालना मिळेल, असे सांगितले. तर सुसोक पार्क यांनी पुणे हे ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी आणि नवोन्मेष क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र बनत असल्याचे नमूद करत कोरियन उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमात ‘कोरिया बिझनेस कल्चर प्रोग्राम’ या सहा आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कोरियन व्यावसायिक संस्कृती, उद्योग क्षेत्र आणि जागतिक करिअरच्या संधींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रामदास बिरादार यांनी केले, तर सूत्रसंचालन युजिन हान यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अनिल माहेश्वरी यांनी केले.
फोटो कॅप्शन :
पिंपरी चिंचवड विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात देशातील पहिल्या ‘कोसमे पुणे बेस कॅम्प’चे उद्घाटन करताना कोरिया प्रजासत्ताकाचे महावाणिज्य दूत डोंगवान यू, पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील आणि मान्यवर.