पिंपरी चिंचवडमध्ये विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई; महापालिकेची कडक भूमिका
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील विनापरवाना जाहिरात फलकांविरोधात कठोर कारवाई करत विविध ठिकाणी उभारलेले फलक हटवले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पुढेही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २३ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत आणि विनापरवाना जाहिरात फलकांविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध भागांमध्ये उभारण्यात आलेले तीन जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले.
महापालिकेच्या नियमानुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २४४ व २४५ तसेच ९ मे २०२२ च्या जाहिरात नियमन अधिनियमांनुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेले फलक हटवण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
या कारवाईदरम्यान कातळेवस्ती, किवळे येथील एन.डी.एस. बँक्वेट्स लॉन समोरील २० बाय २० आकाराचे दोन फलक तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरासमोरील १० बाय १० आकाराचा एक फलक हटवण्यात आला.
महापालिकेने शहरातील सर्व जाहिरात एजन्सी आणि व्यावसायिकांना इशारा दिला असून, यापुढे कोणतेही विनापरवाना फलक उभारल्यास तत्काळ निष्कासनासह कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, शहर नियोजन आणि नागरी शिस्त राखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर नागरिकांचीही जबाबदारी आहे. शहर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि नियोजित ठेवण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
उपायुक्त राजेश आगळे यांनीही स्पष्ट केले की, शहराचे सौंदर्य आणि सुरक्षितता लक्षात घेता अनधिकृत जाहिरात फलकांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही आणि पुढेही अशी कारवाई सुरूच राहणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0