जागतिक हिवताप दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभात फेरी; नागरिकांमध्ये मलेरिया प्रतिबंधाबाबत जनजागृती
जागतिक हिवताप दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वायसीएम रुग्णालयाच्या वतीने संत तुकाराम नगर परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. यामधून नागरिकांना मलेरिया प्रतिबंध, स्वच्छता आणि डास नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात आली.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २६ एप्रिल २०२६ :
जागतिक हिवताप दिनानिमित्त आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्था आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम नगर तसेच रुग्णालय परिसरात हिवताप (मलेरिया) जनजागृतीसाठी प्रभात फेरी आयोजित करण्यात आली.
या प्रभात फेरीद्वारे नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंध, नियंत्रण आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
“आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे”
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या यावर्षीच्या घोषवाक्याचा प्रचार करण्यात आला –
“हिवताप निर्मूलनासाठी कटिबद्ध – आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे!”
तसेच पुढील संदेश देण्यात आले:
कोरडा दिवस पाळा, हिवताप टाळा
घराभोवती पाणी साठू देऊ नका
मच्छरदाणीचा वापर करा
पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करा
आरोग्य विभागाचा सहभाग
या प्रभात फेरीत वायसीएम रुग्णालय प्रशासन, जनआरोग्य वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक, कनिष्ठ निवासी डॉक्टर, परिचर्या विज्ञान संस्था विद्यार्थी तसेच कुटुंब कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे तसेच विभागप्रमुख डॉ. हर्षल पांडवे यांचे मार्गदर्शन लाभले.
“डंख छोटा, धोका मोठा!”
हिवताप (मलेरिया) हा मादी ॲनोफिलीस डासाच्या चाव्याने पसरणारा आजार असून वेळेत उपचार न घेतल्यास गंभीर ठरू शकतो.
हिवतापाची प्रमुख लक्षणे
सतत किंवा अधूनमधून ताप येणे
थंडी वाजणे
अंगावर शहारे येणे
डोकेदुखी व अंगदुखी
मळमळ किंवा उलट्या
अशक्तपणा व थकवा
अचानक घाम येणे
हिवताप टाळण्यासाठी उपाय
घराभोवती पाणी साचू देऊ नका
आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा
मच्छरदाणीचा वापर करा
पूर्ण अंग झाकणारे कपडे घाला
खिडक्या-दरवाज्यांना जाळ्या लावा
डास प्रतिबंधक क्रीम वापरा
परिसर स्वच्छ ठेवा
नागरिकांना आवाहन
हिवतापाची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि स्वच्छतेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.