विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करा – महापौर रवि लांडगे

पिंपरीतील क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् व क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक विद्यामंदिर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Jul 13, 2026 - 00:54
 0  4
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करा – महापौर रवि लांडगे
रवि लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, क्रांतिवीर चाफेकर

पुणे  प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

दि. १२ जुलै २०२६: पिंपरीतील क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् तसेच क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक विद्यामंदिर येथे मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि झालेल्या नुकसानीची महापौर रवि लांडगे यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

पाहणीदरम्यान महापौरांनी शैक्षणिक इमारतीचा परिसर, पावसाच्या पाण्यामुळे बाधित झालेली ठिकाणे, पाणी वाहून जाण्याची व्यवस्था, संरक्षक भिंतीलगतचा परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वावराच्या ठिकाणांची सविस्तर पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित विभागांना केवळ तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती न करता तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात अतिवृष्टीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यावर त्यांनी भर दिला.

परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर व्यवस्थेची तातडीने तपासणी करावी, नुकसान झालेल्या बांधकाम व संरचनात्मक भागांची सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करावी, धोकादायक किंवा असुरक्षित ठिकाणे तातडीने सुरक्षित करावीत तसेच विद्यार्थ्यांच्या वावराच्या परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश महापौरांनी दिले.

तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने संस्थेच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घ्यावा. आवश्यक कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करून तातडीची कामे विलंब न करता सुरू करावीत आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, "विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील आणि सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर किंवा त्यांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण कराव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई स्वीकारली जाणार नाही."

या पाहणीवेळी माजी नगरसदस्य सुरेश भोईर, क्षेत्रीय अधिकारी गोरख लिमन, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मुठाळ, आरोग्य निरीक्षक महेश जगताप, संबंधित अधिकारी तसेच संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0