केंद्राच्या आरोग्य योजनांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवा; प्रतापराव जाधव यांचे मुंबई महापालिकेला निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. धर्मादाय रुग्णालयांमध्ये दुर्बल घटकांसाठी आरक्षित खाटांची माहिती दर्शनी भागात लावावी तसेच प्रमुख महापालिका रुग्णालयांमध्ये जनऔषधी केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

Aug 14, 2026 - 20:49
 0  6
केंद्राच्या आरोग्य योजनांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवा; प्रतापराव जाधव यांचे मुंबई महापालिकेला निर्देश
प्रतापराव जाधव, BMC Health Schemes, मुंबई महापालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका, केंद्रीय आरोग्य योजना, आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जनऔषधी केंद्र

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. १४ ऑगस्ट २०२६ : केंद्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरजू आणि दुर्बल घटकातील नागरिकांना प्रभावीपणे मिळावा, यासाठी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करण्याचे निर्देश केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.

मुंबई महापालिका मुख्यालयात दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री प्रतापराव जाधव होते. यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, रुग्णांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि महापालिका रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरक्षित खाटांची माहिती दर्शनी भागात लावण्याचे निर्देश

धर्मादाय रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू घटकांसाठी आरक्षित असलेल्या रुग्णशय्यांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी त्याबाबतचे फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावावेत, असे निर्देश प्रतापराव जाधव यांनी दिले.

तसेच केंद्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देणारे फलकही रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध योजनांची माहिती तातडीने मिळून त्यांना त्याचा लाभ घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख महापालिका रुग्णालयांमध्ये जनऔषधी केंद्रांसाठी जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख महापालिका रुग्णालयांच्या ठिकाणी जनऔषधी केंद्रांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही राज्यमंत्री जाधव यांनी केली.

कमी किमतीमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जनऔषधी केंद्रांचा रुग्णांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे महापालिका रुग्णालयांच्या परिसरात अशा केंद्रांसाठी आवश्यक सुविधा आणि जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

“आयुष्मान कार्डधारकांना अतिरिक्त कागदपत्रांची सक्ती करू नका”

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थी रुग्णांच्या संदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले. आयुष्मान कार्डधारक रुग्णांना वैद्यकीय सेवा देताना इतर कोणतेही ओळखपत्र किंवा अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची सक्ती करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये या निर्देशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असेही महापौरांनी सांगितले.

विविध आरोग्य योजनांवर सविस्तर चर्चा

या बैठकीत महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना, NACOFच्या माध्यमातून जेनेरिक औषध केंद्रे, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, महानगरपालिकेत प्रोटॉन थेरपी सेंटर उभारणी, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भाशय, स्तन आणि मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

याशिवाय सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्प, अत्याधुनिक आयुष दवाखाना, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर महिलांसाठी मानसिक आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य निधी, महापालिका रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आणि सौरऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी याबाबतही आढावा घेण्यात आला.

केंद्राकडून मिळणारा निधी प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन

केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या तसेच केंद्राकडून तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या सर्व आरोग्य सेवांचा लाभ थेट आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणारा जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी आणि उपलब्ध निधीचा प्रभावी तसेच वेळेत विनियोग सुनिश्चित करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित

या बैठकीस मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, खासदार रवींद्र वायकर, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेना गटनेते अमेय घोले, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोषी सक्रे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे, एल प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे यांच्यासह विविध नगरसेवक, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, राज्य शासन व महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.