हरिनामाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे मंगल प्रस्थान; देहूनगरीत भक्तिमय वातावरण
देहूनगरीत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरिनामाच्या गजरात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. विविध मान्यवरांनी सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन घेतले.
पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे
वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आज देहूनगरीत अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. हरिनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने मंगल प्रस्थान केले.
देहूनगरीत पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. "ज्ञानबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पालखी प्रस्थानावेळी वारकऱ्यांमध्ये उत्साह आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार सुनील अण्णा शेळके, आमदार महेशदादा लांडगे, मा. आमदार विलास लांडे पाटील, देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, विश्वस्त गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विठ्ठल महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे तसेच पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख सुनील हगवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी परंपरेचे कौतुक केले. संतांच्या विचारांचा वारसा समाजात कायम जपला जावा आणि भक्ती, समता व मानवतेचा संदेश अधिक व्यापक व्हावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत पायी वारी करत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत असून, संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. 🚩🙏
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0