तळंदगेतील ऐतिहासिक श्री जगन्नाथ मंदिरात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न

दक्षिण महाराष्ट्राची ‘प्रतिपुरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळंदगे येथील ऐतिहासिक श्री जगन्नाथ मंदिरात गुरुपौर्णिमेचा सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. भजन, प्रवचन, पाद्यपूजन, महाआरती आणि महाप्रसादाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

Jul 31, 2026 - 17:21
 0  99
तळंदगेतील ऐतिहासिक श्री जगन्नाथ मंदिरात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न
तळंदगे गुरुपौर्णिमा, श्री जगन्नाथ मंदिर तळंदगे, गुरुपौर्णिमा उत्सव

कोल्हापूर प्रतिनिधी | उमेश जाधव 

तळंदगे : दक्षिण महाराष्ट्राची ‘प्रतिपुरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळंदगे येथील ऐतिहासिक श्री जगन्नाथ मंदिर परिसरात यंदाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव मंगलमय आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. भजन, पाद्यपूजन, ज्ञानमय प्रवचन, महाआरती आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

परमपूज्य सद्गुरु लोले महाराज आणि लष्करी गुरुजी यांच्या दिव्य आशीर्वादाने तसेच प्रणव केंद्रप्रमुख सद्गुरु महादेव मोठे महाराज यांच्या पावन अधिपत्याखाली या गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गोपाळकाला विधीने करण्यात आली. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या सुमधुर आणि श्रवणीय भजनांनी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने भजनाचा आनंद घेतला.

यानंतर सद्गुरु महादेव मोठे महाराज यांचे भव्य पाद्यपूजन मंगल घोष आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले. या वेळी उपस्थित भाविकांनी सद्गुरुंच्या चरणी श्रद्धा व्यक्त करत गुरुपौर्णिमेचा सोहळा उत्साहात साजरा केला.

या मंगल प्रसंगी सद्गुरु महादेव मोठे महाराज आणि खामकर महाराज यांची ज्ञानमय व ओघवत्या शैलीतील प्रवचने झाली. आपल्या मार्गदर्शनात सद्गुरु मोठे महाराज यांनी मानवी जीवनातील सद्गुरुंचे महत्त्व विशद केले.

“मानवी जीवनात सद्गुरुंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच माणसाला खरा आध्यात्मिक मार्ग सापडतो. गुरुसेवा हीच ईश्वरसेवा आहे,” असे त्यांनी सांगितले.

खामकर महाराज यांनीही आपल्या निरूपणातून नामस्मरणाचे महत्त्व आणि सद्गुरुनिष्ठेची आवश्यकता भक्तांना पटवून दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक जीवनाचा संदेश मिळाला.

प्रवचनानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य महाआरती करण्यात आली. महाआरतीच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय जयघोषांनी दुमदुमून गेला. सोहळ्यानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

हा भव्य धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी सद्गुरु लोले महाराज प्रणित प्रणव केंद्र भक्त मंडळ, गावातील विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवकांनी मोलाची सेवा बजावली. नियोजनबद्ध व्यवस्थापन, स्वयंसेवकांचे योगदान आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे तळंदगे परिसरातील यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव अविस्मरणीय ठरला

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.