वांद्रे पूर्वेतील पुनर्विकास प्रकल्पांना गती; म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची प्रत्यक्ष पाहणी
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी वांद्रे (पूर्व) परिसरातील तीन महत्त्वाच्या पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी करत कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रकल्पांची गुणवत्ता, वेग आणि रहिवाशांच्या पुनर्वसनासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सोमवारी वांद्रे (पूर्व) परिसरातील विविध पुनर्विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बांधकामाची गुणवत्ता, प्रकल्पांची सद्यस्थिती आणि रहिवाशांच्या पुनर्वसनासंदर्भातील बाबींची सविस्तर माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
सर्वप्रथम त्यांनी खेरनगर येथील श्रीराम गृहनिर्माण संस्थेच्या इमारत क्रमांक १ अंतर्गत सुरू असलेल्या स्वयं-पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामध्ये १५ मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच या स्वयं-पुनर्विकास प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी म्हाडाने सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
यानंतर त्यांनी निर्मल नगर येथील पुनर्विकास प्रकल्पाला भेट देऊन पुनर्वसन इमारत विंग-अ मधील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी प्रस्तावित स्थलांतरित रस्त्याच्या जागेचीही पाहणी करण्यात आली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक समन्वय राखण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच पुनर्वसन इमारतीचे काम लवकर पूर्ण करून रहिवाशांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश विकासकाला देण्यात आले.
त्यानंतर संजीव जयस्वाल यांनी एमआयजी ग्रुप-६, गांधीनगर येथील पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पांतर्गत जुन्या इमारतींचे पाडकाम पूर्ण झाले असून नवीन इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. प्रकल्पाची गती कायम ठेवत बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात उपमुख्य अभियंता भूषण देसाई, कार्यकारी अभियंता रुपेश तोटेवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना गती देत नागरिकांना सुरक्षित आणि आधुनिक घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने म्हाडा प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0