सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा; शेतकऱ्यांचे ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेले उपोषण मागे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’च्या लाभासाठी आधार प्रमाणीकरणातील तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. आश्वासनानंतर आझाद मैदानातील उपोषण मागे घेण्यात आले.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई, दि. ८ : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळताना येणाऱ्या आधार प्रमाणीकरणातील तांत्रिक अडचणींबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी बांधवांशी सकारात्मक चर्चा केली. या चर्चेनंतर संबंधित अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याने ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदान येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण मागे घेण्यात आले.
राष्ट्रीय मराठा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळकर यांच्यासह शेतकरी बांधवांनी विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे ५ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपोषणकर्त्या शेतकरी बांधवांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, वाढते वय, शेतीच्या कामामुळे बोटांचे ठसे झिजणे तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे काही पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
याबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आधार प्रमाणीकरणाशी संबंधित अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर मांडण्यात येतील. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मंत्र्यांनी शेतकरी बांधवांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत त्यावर आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. अंकुशराव पाटील होनाळकर यांनी आझाद मैदान येथे ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेले उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
या चर्चेमुळे आधार प्रमाणीकरणाच्या तांत्रिक अडचणींमुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे.