महिला स्वयंसहायता गटांनी देशात क्रांती घडवली; 'फॉर्च्युन इंडिया 100 मोस्ट पॉवरफुल वूमेन' सन्मान सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
मुंबईत आयोजित 'फॉर्च्युन इंडिया 100 मोस्ट पॉवरफुल वूमेन' सन्मान सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महिला स्वयंसहायता गटांमुळे ग्रामीण व आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाल्याचे सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी आणि नीरजा बिर्ला यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे
महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली असून ग्रामीण व आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडले आहेत. गावागावातील महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत असून हा बदल समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
मुंबई येथे आयोजित 'फॉर्च्युन इंडिया 100 मोस्ट पॉवरफुल वूमेन' सन्मान सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'फॉर्च्युन इंडिया' मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
महिलांना संबोधित करताना राज्यपालांनी त्रिपुरातील एका ग्रामीण महिलेचे उदाहरण देत सांगितले की, जी महिला पूर्वी बँकेत जाण्यासही घाबरत होती तीच आज 'बँक सखी' म्हणून आत्मविश्वासाने काम करत अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत आहे. महिलांकडील कर्जाचा एनपीए दर एक टक्क्यापेक्षाही कमी असल्याने महिलांच्या हातात दिलेला पैसा अधिक सुरक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशाच्या लोकसंख्येतील जवळपास निम्मा हिस्सा महिलांचा असून त्यांच्या सर्वांगीण विकासाशिवाय 'विकसित भारत'चे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे शेवटच्या स्तरावरील महिलेपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी महिलांना विकास प्रक्रियेतील केवळ सहभागी नव्हे तर परिवर्तनाच्या अग्रदूत असल्याचे सांगितले. मातृ आरोग्य सुधारणा, 'नारीशक्ती वंदन अधिनियम', 'पोषण अभियान', 'आयुष्मान भारत', 'जनऔषधी', 'लखपती दीदी' आणि 'नमो ड्रोन' यांसारख्या केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह-संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, तसेच उद्योग, बँकिंग आणि व्यवसाय क्षेत्रातील अनेक प्रभावी महिला उपस्थित होत्या.
आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका यांनी प्रास्ताविक केले, तर फॉर्च्युन इंडियाचे मुख्य संपादक सौरव मुजुमदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.