‘येळकोट येळकोट जय मल्हार!’च्या जयघोषात नाशिक ते जेजुरी सायकलवारीला उत्साहात प्रारंभ
नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित नाशिक ते जेजुरी सायकलवारीच्या दुसऱ्या वर्षाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. भक्ती, आरोग्य आणि सायकलिंगचा अनोखा संगम.
नाशिक ब्यूरो
नाशिक : ‘येळकोट येळकोट जय मल्हार! सदानंदाचा येळकोट! खंडेराव महाराज की जय!’ अशा भक्तिमय जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असताना नाशिक ते जेजुरी सायकलवारीला आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष असून, भक्ती, आरोग्य आणि सायकलिंग यांचा अनोखा संगम या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे.
आज सकाळी ठीक ६ वाजता नाशिक येथे या सायकलवारीचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे संस्थापक श्री. हरीश बैजल, संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र वानखेडे, विद्यमान अध्यक्ष श्री. अमित नारायण घुगे, उपाध्यक्ष श्री. दविंदर सिंग भेला, वारी प्रमुख सौ. माधुरी गडाख आणि श्री. कारभारी भोर यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकलवारीला रवाना करण्यात आले.
यावेळी उपस्थित सायकलिस्ट सदस्यांनी खंडेराव महाराजांचा जयघोष करत उत्साहाने सायकलवारीत सहभाग घेतला. नाशिक ते जेजुरी असा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला प्रवास सायकलवरून पूर्ण करण्याचा संकल्प सहभागी सायकलपटूंनी केला आहे.
या सायकलवारीचा नियोजित मार्ग नाशिक – सिन्नर – संगमनेर – नारायणगाव असा असून, आज सायंकाळी ही सायकलवारी श्री क्षेत्र रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती मंदिरात पोहोचणार आहे. प्रवासादरम्यान विविध ठिकाणी स्थानिक सायकलिंग समूहांकडून सहभागी सदस्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान, सायकलवारीचे सिन्नर येथे सिन्नर सायकलिस्ट परिवाराच्या वतीने हॉटेल विठू माऊली येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक सायकलप्रेमींनी सहभागी सायकलपटूंचे स्वागत करून त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या शुभारंभप्रसंगी नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या संचालिका सौ. अश्विनी कोंडेकर, सौ. दीपाली माळी, सौ. सीमा घुगे, श्री. सुरेश डोंगरे, श्री. राकेश अपसुंदे, श्री. सौरव काळे, संस्थेचे माजी पदाधिकारी तसेच महिला व पुरुष सायकलिस्ट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्ती, आरोग्य आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश
नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक श्रद्धेसोबतच आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न. सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचे महत्त्वही अधोरेखित होते. धार्मिक परंपरेचे जतन करत समाजात व्यायाम, आरोग्य जागरूकता आणि सायकलिंगची आवड निर्माण करण्याचा संदेश या सायकलवारीतून दिला जात आहे.
केवळ धार्मिक स्थळापर्यंत पोहोचणे एवढाच या सायकलवारीचा उद्देश नसून, सामूहिक सहभाग, शिस्त, एकजूट आणि निरोगी जीवनशैली यांचा आदर्श समाजासमोर ठेवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. दुसऱ्या वर्षात पदार्पण केलेल्या या उपक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या या सायकलवारीने भक्ती आणि आरोग्याचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचविला आहे.