कोल्हापूर विभागाला १२० नवीन बसांची घोषणा; चार आधुनिक बसस्थानकांचे लोकार्पण
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेसची घोषणा केली. संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण करण्यात आले असून, गेल्या दोन वर्षांत १७ बसस्थानकांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे.
कोल्हापूर, दि.१७ : कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेस देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण व विस्तारित बसस्थानकांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून कोल्हापूर विभागात एकूण २३ बसस्थानके असून, त्यापैकी १७ बसस्थानकांचे नूतनीकरण मागील दोन वर्षांत पूर्ण झाले आहे. उर्वरित स्थानकांच्या आधुनिकीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात सर्व बसस्थानके अत्याधुनिक करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
शासन आणि खाजगी संस्थांच्या (PPP मॉडेल) माध्यमातून जिल्ह्यातील सहा बसस्थानकांचा विकास केला जाणार आहे. जयसिंगपूर बसस्थानकाच्या पुढील विस्तारीकरणासाठी चालू आर्थिक वर्षात निधी देण्याची घोषणा करण्यात आली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एसटी सेवेतील सुधारणा, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या निर्णयांचे स्वागत केले. तसेच कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर PPP मॉडेल राबवण्याची मागणी केली.
संभाजीनगर बसस्थानक ९.८० कोटींच्या मंजुरीतून अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात आले असून, येथे ११ फलाट, प्रतीक्षालय, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, जनऔषधी केंद्र, पोलीस चौकी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
वाठार येथे ४ फलाटांचे आधुनिक बसस्थानक उभारण्यात आले आहे, तर पेठवडगाव येथे १.४४ कोटींच्या खर्चातून ५ फलाटांचे सुसज्ज केंद्र तयार करण्यात आले आहे.
जयसिंगपूर बसस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यात ८ फलाट, १७ दुकाने आणि पोलीस चौकीसह अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. मंत्री सरनाईक यांनी यासाठी अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0