सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील सामान्य नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ७४ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. १५ (जिमाका) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आरोग्यसेवा ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यात नव्याने उभारण्यात आलेल्या ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ७४ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नव्याने उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांचे लोकार्पण हा राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत गौरवपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. राज्याला अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे.
कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ आणि सुविधांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कॅशलेस उपचाराची सुविधाही सुरू करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
१२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण महत्त्वपूर्ण
पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, राज्यातील १२४ आरोग्य संस्थांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत संस्मरणीय आहे. वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या अभावामुळे काही ठिकाणी बंद असलेली रुग्णालये आवश्यक सुविधा उपलब्ध करून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना केवळ पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक अद्ययावत आणि सक्षम करण्याला प्राधान्य राहणार असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा संदेशही उपस्थितांसमोर सादर करण्यात आला.
‘महा पल्स-एआय’ अंतर्गत जिल्हा आरोग्य कमांड सेंटर
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘महा पल्स-एआय’ प्रकल्पाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘जिल्हा आरोग्य कमांड सेंटर’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील १०४ शासकीय आरोग्य संस्था, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच ८२ प्राथमिक आरोग्य केंद्रे एका डिजिटल व्यासपीठावर जोडण्यात येणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आरोग्य सेवांचे व्यवस्थापन आणि देखरेख अधिक प्रभावी करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या कमांड सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक सुविधा आणि माहिती एकाच छताखाली मोफत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन सहभागी
या कार्यक्रमास आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दौलत दरोडा, शरद सोनवणे, प्रकाश सोळंके आणि विनोद निकोले, तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक आदी ऑनलाइन सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आरोग्य सेवा तथा अभियान संचालक (राआअ), मुंबई संजय काटकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, सहायक संचालक डॉ. संजय रणवीर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राथमिक आरोग्य सेवा, मुंबई येथील संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आभार मानले.
नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटरमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य सेवा अधिक सुलभ, गतिमान, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिककेंद्रित होण्यास मोठी मदत होणार आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0