ओशिवरा प्रसूतीगृह नागरिकांच्या सेवेत; जोगेश्वरीतील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा

जोगेश्वरी (पश्चिम) येथील ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौर रितू तावडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ५० रुग्णशय्या, सुसज्ज शस्त्रक्रिया गृह, स्त्रीरोग, बालरोग आणि विशेष नवजात शिशु अतिदक्षता विभागासह प्रसूतीगृह नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित झाले.

Aug 6, 2026 - 02:19
Aug 22, 2026 - 18:39
 0  9
ओशिवरा प्रसूतीगृह नागरिकांच्या सेवेत; जोगेश्वरीतील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा
ओशिवरा प्रसूतीगृह, जोगेश्वरी पश्चिम, रितू तावडे, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई आरोग्य सेवा,

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

मुंबई, दि. ५ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जोगेश्वरी (पश्चिम) येथील कॅप्टन सामंत मार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या ओशिवरा प्रसूतीगृहाचे मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर प्रसूतीगृह तत्काळ नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आले असून, जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता आणि नवजात बालकांना त्यांच्या निवासस्थानाजवळ दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

लोकार्पण कार्यक्रमाला महापौर रितू तावडे यांच्यासह स्थानिक आमदार हारून खान, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, स्थानिक नगरसेवक रुपेश सावरकर, नगरसेवक विठ्ठल बंधिरे, नगरसेविका सुधा सिंग, परिमंडळ ४ च्या उपआयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपआयुक्त शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी, के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले, रुग्णालये पायाभूत सुविधा कक्षाचे उपप्रमुख अभियंता मनोज राणे तसेच स्थानिक नागरिक, डॉक्टर, परिचारिका, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या, “हे प्रसूतीगृह केवळ एक इमारत नसून सुरक्षित मातृत्व आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे. वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्यास बाळंतपणातील बहुतांश धोके टाळता येतात. त्यामुळे स्थानिक स्तरावर अशा सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याची सर्वांगीण जबाबदारी पार पाडत असून, महिलांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जोगेश्वरी (पश्चिम), आदर्श नगर, बेहराम बाग, गौतम नगर आणि शास्त्री नगर या परिसरातील हजारो नागरिकांना ओशिवरा प्रसूतीगृहाचा थेट लाभ होणार आहे. गर्भवती माता आणि नवजात बालकांना त्यांच्या निवासस्थानाजवळ दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याने मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

“बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ओशिवरा प्रसूतीगृह हे त्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.

यावेळी आमदार हारून खान, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे आणि स्थानिक नगरसेवक रुपेश सावरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपआयुक्त शरद उघडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून ओशिवरा प्रसूतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी प्रसूतीगृहाच्या संपूर्ण इमारतीची पाहणी करून विविध विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा आणि सुविधांची माहिती घेतली.

जीर्ण इमारतीच्या जागी आधुनिक व सुसज्ज प्रसूतीगृह

ओशिवरा प्रसूतीगृहाची पूर्वीची इमारत जीर्ण झाल्याने तेथील आरोग्यसेवा तात्पुरत्या स्वरूपात टोपीवाला प्रसूतीगृह येथे हलविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेला सुविधा भूखंड अर्थात अमेनीटी प्लॉट अंतर्गत प्राप्त झालेल्या जागेवर तळमजला अधिक तीन मजली आधुनिक व सुसज्ज इमारतीत नव्या ओशिवरा प्रसूतीगृहाची उभारणी करण्यात आली.

आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेले हे प्रसूतीगृह आता पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

५० रुग्णशय्यांची सुविधा

नवीन ओशिवरा प्रसूतीगृहामध्ये एकूण ५० रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये—

स्त्रीरोग व प्रसूती विभागासाठी ३४ रुग्णशय्या

बालरोग विभागासाठी १० रुग्णशय्या

विशेष नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी (SNCU) ६ रुग्णशय्या

याशिवाय प्रसूतीगृहामध्ये सुसज्ज शस्त्रक्रिया गृह, बाह्यरुग्ण विभाग (OPD), आंतररुग्ण विभाग (IPD) तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रसूतीगृहामार्फत स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ सेवा, बालरोग सेवा, सुरक्षित प्रसूती, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची देखभाल, नवजात शिशु सेवा, कुटुंब नियोजन, लसीकरण तसेच माता व बाल आरोग्यविषयक समुपदेशन अशा सर्वसमावेशक आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

प्रसूतीगृहामध्ये एक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दोन स्त्रीरोग तज्ज्ञ, एक बालरोग तज्ज्ञ आणि प्रशिक्षित परिचारिकांची टीम कार्यरत असून, नागरिकांना २४ तास आरोग्यसेवा देण्यात येणार आहे.

ओशिवरा प्रसूतीगृह कार्यान्वित झाल्यामुळे जोगेश्वरी आणि लगतच्या परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना वेळेत, सुरक्षित आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, माता व बाल आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.