मेट्रो-३ मधील वारणाच्या स्टॉलला नागरिकांची उत्स्फूर्त पसंती; महिन्याभरात १० हजारांनी घेतला पारंपरिक पेयांचा आस्वाद
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मेट्रो-३) स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या वारणाच्या स्टॉलला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या महिनाभरात १० हजारांहून अधिक नागरिक आणि मेट्रो प्रवाशांनी दूध, दही, श्रीखंड आणि बासुंदीचा आस्वाद घेत नवीन विक्रम नोंदविला आहे.
प्रतिनिधी : मिलिंद कारेकर | मुंबई
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मेट्रो-३) स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या वारणा डेअरीच्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या महिनाभरात १० हजारांहून अधिक नागरिक आणि मेट्रो प्रवाशांनी वारणाच्या दूध, दही, श्रीखंड आणि थंडगार बासुंदीचा आस्वाद घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
१६ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर अल्पावधीतच या स्टॉलला मोठी लोकप्रियता मिळाली असून, महाराष्ट्रातील पारंपरिक दुग्धजन्य पदार्थांना मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
जून महिन्यापासून हजारो नागरिकांनी या स्टॉलला भेट देत वारणाच्या दर्जेदार आणि पौष्टिक उत्पादनांची पसंती दर्शविली आहे. दूध, दही, श्रीखंड आणि बासुंदीसारख्या पारंपरिक पदार्थांना मिळालेल्या या प्रतिसादामुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादनांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता मेट्रो-३च्या आणखी सहा स्थानकांवर वारणाचे स्टॉल सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान दर्जेदार आणि स्वस्त दरात दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होणार आहेत.
गिरगाव येथील कविता साने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "पाश्चात्त्य कोल्ड ड्रिंक्सपेक्षा महाराष्ट्रातील घरगुती आणि पारंपरिक पेये अधिक चविष्ट, पौष्टिक आणि विश्वासार्ह आहेत. अशा उत्पादनांना नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे."
एका मेट्रो प्रवाशाने सांगितले की, "स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळाल्यास रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल."
सुमारे ६९ वर्षांची परंपरा लाभलेल्या 'वारणा' या ब्रँडने गुणवत्तेच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मेट्रो-३ स्थानकावरील या उपक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे महाराष्ट्रातील स्थानिक आणि पारंपरिक उत्पादनांना महानगरातील नागरिकांची पसंती वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.