लोकनेते युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाचे आंदोलन; 'अ-ब-क-ड' उप-वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड येथे लोकनेते युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या विविध संघटनांनी अनुसूचित जातींमध्ये लोकसंख्येनुसार 'अ-ब-क-ड' उप-वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.

Jul 13, 2026 - 22:15
 0  12
लोकनेते युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाचे आंदोलन; 'अ-ब-क-ड' उप-वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी
युवराज दाखले, मातंग समाज, अ ब क ड उपवर्गीकरण

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

अनुसूचित जातींमध्ये लोकसंख्येनुसार 'अ-ब-क-ड' उप-वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी लोकनेते युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड येथे मातंग समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलन केले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.

यावेळी बोलताना युवराज दाखले म्हणाले की, मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकसंख्येनुसार उप-वर्गीकरणाची सातत्याने मागणी करण्यात येत आहे. शंकरभाऊ तालिके यांच्या नेतृत्वाखालीही ही लढाई दीर्घकाळ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व पोटजातींना न्याय मिळण्यासाठी उप-वर्गीकरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले असल्याचा दाखला देत त्यांनी पंजाब, तमिळनाडूसह काही राज्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था लागू करण्यात आल्याचे नमूद केले. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गठित केलेल्या बीदर समितीचा अहवाल सादर झाला असून त्यानुसार तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी निवेदनामध्ये सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह टीका करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, ARTI चे मुख्यालय हाप्किन महामंडळाच्या पाच एकर जागेवर उभारण्यात यावे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा पिंपरी येथे उभारावा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात धमकी देणाऱ्यांवर तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

शासनावर विश्वास असून प्रशासन या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास व्यक्त करताना युवराज दाखले यांनी तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या राज्य शासन आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.

आंदोलनादरम्यान शेकडो पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उप-वर्गीकरणाबाबत तातडीने निर्णय घेऊन शासनाने सकारात्मक आदेश काढावेत, अशी जोरदार मागणी केली.

आंदोलनापूर्वी निगडी येथील मधुकर पवळे पुलाजवळ असलेल्या महाराणा प्रताप आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंदू मातंग एकता सेना तसेच शिवशाही शासन पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेते युवराज दाखले यांनी नायब तहसीलदारांना सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.