कृषी विद्यापीठांचे सेवा प्रवेश नियम अधिक सुसंगत करावेत; गुणवत्ता व ज्येष्ठतेला प्राधान्य देण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये एकसूत्रता आणून गुणवत्ता, ज्येष्ठता आणि राष्ट्रीय मानकांना प्राधान्य देण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

Aug 13, 2026 - 19:48
 0  5
कृषी विद्यापीठांचे सेवा प्रवेश नियम अधिक सुसंगत करावेत; गुणवत्ता व ज्येष्ठतेला प्राधान्य देण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
कृषी विद्यापीठ, सेवा प्रवेश नियम, दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री, कृषी शिक्षण, गुणवत्ता व ज्येष्ठता, कृषी विद्यापीठ कर्मचारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२६ : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये एकसूत्रता आणून गुणवत्ता आणि ज्येष्ठतेला प्राधान्य देण्यात यावे. सेवा प्रवेश नियम अधिक सुसंगत, गुणवत्ताधारित आणि राष्ट्रीय मानकांशी अनुरूप असावेत, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

आमदार रणधीर सावरकर यांच्यासह महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सेवा प्रवेश नियमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

चारही कृषी विद्यापीठांमध्ये समान नियमांची अंमलबजावणी

शासनाने कृषी व पदुम विभागाच्या १० जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार चारही कृषी विद्यापीठांतील गट-अ आणि गट-ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता दिली आहे.

या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या चारही विद्यापीठांमध्ये सेवा प्रवेश नियमांची समान अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली.

सेवा प्रवेश नियम निश्चित करताना ‘गुणवत्ता व ज्येष्ठता’ हे प्रमुख तत्त्व ठेवण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचा विचार

शिक्षकवर्गीय तसेच शिक्षकेतर पदांसाठी सेवा प्रवेश प्रक्रिया निश्चित करताना संबंधित कायदे, परिनियम आणि शासन निर्णयांचा आधार घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचाही विचार करण्यात आला आहे.

चारही कृषी विद्यापीठांमध्ये सेवा प्रवेश नियमांची एकसमान अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित परिनियमांमधील तरतुदींच्या आधारे नियम तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या नियमांचा विद्यापीठांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि राष्ट्रीय स्तरावरील मानकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश कृषीमंत्री भरणे यांनी दिले.

प्रचलित शासन निर्णयांच्या आधारे नियम निश्चित करावेत

शिक्षकवर्गीय पदांसाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करताना भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम, १९८३ आणि परिनियम, १९९० मधील तरतुदींचाही आधार घेण्यात आला आहे.

शिक्षकेतर पदांसाठीही महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम आणि परिनियमांमधील तरतुदी तसेच प्रचलित शासन निर्णयांच्या आधारे सेवा प्रवेश नियम निश्चित करावेत, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

भरती आणि पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता

चारही कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सेवा प्रवेश प्रक्रिया अधिक स्पष्ट, पारदर्शक आणि गुणवत्ताधारित करण्याच्या दृष्टीने एकसमान नियम निश्चित करण्यावर भर देण्यात आला.

सेवा प्रवेश प्रक्रियेत थेट भरती आणि पदोन्नती या दोन्ही मार्गांचा विचार करताना संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता, गुणवत्ता, ज्येष्ठता आणि शैक्षणिक निकष यांचा योग्य समन्वय साधावा, असे निर्देश कृषीमंत्री भरणे यांनी दिले.

एकसमान आणि गुणवत्ताधारित सेवा प्रवेश नियमांमुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या प्रशासकीय व शैक्षणिक व्यवस्थेत अधिक सुसूत्रता निर्माण होण्यास मदत होणार असून, गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाच्या माध्यमातून कृषी शिक्षण आणि संशोधनाची गुणवत्ता अधिक बळकट करण्यास हातभार लागणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.