विनर्स अकादमीची मिळकत आळंदी नगरपरिषदेने केली सील; आवश्यक परवानग्यांची तपासणी

दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेची शहरातील कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी सुरू आहे. पाहणीनंतर विनर्स अकादमीची मिळकत सील करण्यात आली.

विनर्स अकादमीची मिळकत आळंदी नगरपरिषदेने केली सील; आवश्यक परवानग्यांची तपासणी
आळंदी नगरपरिषद, विनर्स अकादमी, विनर्स अकादमी सील, आळंदी कोचिंग क्लासेस, दिवेआगर विद्यार्थी मृत्यू, माधव खांडेकर, सीमा चारवे, आळंदी

प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

आळंदी, (प्रतिनिधी): दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेकडून शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस आणि विविध आस्थापनांची पाहणी करण्यात येत आहे. या पाहणी मोहिमेअंतर्गत विनर्स अकादमीच्या मिळकतीवर नगरपरिषदेने कारवाई करत सदर मिळकत सील केली आहे.

आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्रमांक जुना ११३७, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले.

नगरपरिषदेच्या अभिलेखांची तपासणी केली असता, सदर आस्थापनाने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे अभिलेखावरून निदर्शनास आले नसल्याचे नगरपरिषदेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे लागू कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्यानुसार मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची संबंधित मिळकत सील करण्याची कार्यवाही केली. या कारवाईदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे की, संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या घेऊन लागू असलेल्या नियमांचे पालन करावे, तसेच नगरपरिषदेकडून लागू कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, दिवेआगर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस आणि आस्थापनांची तपासणी सुरू असून, त्यांच्या आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन याबाबत नगरपरिषदेकडून पाहणी केली जात आहे.