अंतर्नाद’ संगीत नाटकाचा १६ मे रोजी चिंचवडमध्ये शुभारंभ; भक्ती, संगीत आणि आत्मशोधाचा अनोखा प्रवास

पंढरीच्या वारीचा आध्यात्मिक अनुभव आणि आत्मशोधाचा प्रवास मांडणारे ‘अंतर्नाद’ हे भव्य संगीत नाटक १६ मे रोजी चिंचवडमध्ये रंगणार आहे. ५१ कलाकारांच्या सहभागासह अभंग, भारुड आणि लोकसंगीताचा अनोखा संगम या नाटकातून अनुभवायला मिळणार आहे.

May 14, 2026 - 03:40
 0  3
अंतर्नाद’ संगीत नाटकाचा १६ मे रोजी चिंचवडमध्ये शुभारंभ; भक्ती, संगीत आणि आत्मशोधाचा अनोखा प्रवास
अंतर्नाद, संगीत नाटक, चिंचवड, पंढरपूर वारी, वारकरी संप्रदाय, भाऊसाहेब भोईर, मोरया थिएटर्स, मराठी नाटक, भक्ती संगीत, अभंग, भारुड, पिंपरी चिंचवड सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी रंगभूमी, विठ्ठल भक्ती, मनोज डाळिंबकर

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वात भक्ती, संगीत आणि आत्मशोधाचा अनोखा संगम घडवणारे ‘अंतर्नाद’ हे भव्य संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार, १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगणार आहे. ‘मोरया थिएटर्स’ निर्मित या नाटकाचे निर्माते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आहेत.

पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर यांनी नाटकाबाबत माहिती दिली. यावेळी प्रणव सपकाळे, मनोज डाळिंबकर, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे आणि राजू बंग उपस्थित होते.

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, “पंढरीची वारी हा जगातील एकमेव असा आध्यात्मिक सोहळा आहे, ज्यामध्ये सर्व अठरा पगड जाती-धर्मातील लोक एकत्र येऊन विठ्ठल भक्तीत सहभागी होतात. देहू-आळंदी ते पंढरपूर या वारीचा आत्मिक अनुभव ‘अंतर्नाद’ या संगीत नाटकातून अडीच तासांत प्रेक्षकांना अनुभवता येईल.”

या नाटकात तब्बल ५१ कलाकारांचा सहभाग असून अभंग, गवळण, भारुड आणि पोवाड्यांचा सुरेल संगम पाहायला मिळणार आहे. लोकसंगीतातील विविध पारंपरिक वाद्यांचा वापर करून नाटकाला विशेष संगीतसाज चढवण्यात आला आहे. वारकरी परंपरेचा आध्यात्मिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे.

‘अंतर्नाद’ हे केवळ नाटक नसून आत्म्याशी संवाद साधणारा भावस्पर्शी प्रवास आहे. आषाढी वारीत सहभागी झालेल्या एका युवा वारकऱ्याच्या विठ्ठलभक्तीतून घडणारा अंतर्मनाचा शोध या कथानकातून उलगडला जातो.

या नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळिंबकर यांचे आहे. संगीत निरंजन पेडगावकर यांनी दिले असून गीतलेखन मुराद तांबोळी यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे आणि सौगंध कापसे यांनी केले आहे. प्रकाशयोजना अभिप्राय कामठे, रंगभूषा कमलेश बिचे, वेशभूषा वेदिका काळे आणि सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी सांभाळले आहे.

या नाटकाचा दुसरा प्रयोग शुक्रवार, २२ मे रोजी हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता होणार आहे. नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तसेच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर उपलब्ध आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.